महागाई भत्त्यात 3% वाढ; ‘या’ राज्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार!

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी राज्यातील सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी महागाई भत्त्यात (DA) 3% वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता महागाई भत्ता 55% वरून 58% होणार आहे.
१६ लाख लोकांना होणार फायदा:
हा सुधारित महागाई भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा सुमारे १६ लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. मात्र, या वाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक अंदाजे १,८२९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, सरकारी कर्मचारी आणि शिक्षक हेच शासनाच्या योजनांना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे, आर्थिक अडचणी असल्या तरी सरकार त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.
निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे पाऊल:
तामिळनाडूमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. डीएमके सरकारने निवडणुकीच्या वेळी जुनी निवृत्ती वेतन योजना (OPS) पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढत होता.
वेतनामध्ये थेट दिलासा:
महागाई भत्ता (DA) हा वेतनाचा असा भाग असतो, जो कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून वाचवण्यासाठी दिला जातो. जेव्हा महागाई वाढते, तेव्हा सरकार डीए मध्ये वाढ करते. केंद्रातील सरकारने देखील दिवाळीपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डीए/डीआर मध्ये 3% वाढ करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे वार्षिक खर्च सुमारे १०,०८३ कोटी रुपयांनी वाढणार आहे.
या राज्यांनीही दिली होती कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट:
-तामिळनाडूने घोषणा करण्यापूर्वी अनेक राज्यांनी दिवाळीनिमित्त महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती.
-हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी 3% डीए वाढ जाहीर केली होती.
-उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए मध्ये 3% वाढ करण्याची घोषणा केली होती.
-झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने डीए 55% वरून 58% केला होता.
-उत्तराखंडमध्येही धामी सरकारने 3% डीए वाढ जाहीर केली होती.
-मध्य प्रदेशमध्ये सीएम मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने डीए आणि डीआर मध्ये 2% वाढ केली होती.
-बिहारमध्ये सीएम नितीश कुमार यांनी 3% डीए वाढ जाहीर केली होती.
-राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची घोषणा केली होती.


