‘शक्ती’ चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या…

Cyclone Shakti | राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने (IMD) ‘शक्ती’ चक्रीवादळाची घोषणा केली असून, हे २०२५ चे पहिले चक्रीवादळ म्हणून नोंदवले गेले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागात तयार झालेले हे वादळ पश्चिमेकडे सरकत असून, ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गुजरातमधील द्वारकापासून ४२० किमी अंतरावर समुद्रात हे वादळ सक्रिय आहे, आणि त्याचे वारे ताशी १०० किमी वेगाने वाहत आहेत.
महाष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा ?
शक्ती चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत खूप उंच लाटा आणि मुसळधार पाऊस होईल. यामुळे पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अरबी समुद्रात गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज
या वादळामुळे देशातील कोणत्या भागावर थेट परिणाम होण्याची शक्यता कमी असली तरी, समुद्रातील स्थिती मात्र धोकादायक बनली आहे. हवामान विभागाने 7 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे.
सूचना जारी
महाराष्ट्र सरकारने चक्रीवादळ शक्तीबाबत अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा प्रशासनांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे, किनारी आणि सखल भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्याचे आणि सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Cyclone Shakti |
दरम्यान, मराठवाडा, सोलापूर, जालना, जळगावसारख्या भागांत पावसाने शेतकऱ्यांना आधीच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता ‘शक्ती’मुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. Cyclone Shakti |
हेही वाचा:
ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा फटका; ग्राहकांच्या खिशाला कात्री



