बांगलादेशात रेमल चक्रिवादळामुळे शेकडो घरे आणि पिकांचे नुकसान; १० जणांचा मृत्यू

ढाका – रेमल चक्रिवादळ काल मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेशमध्ये थडकले. खबरदारीचा उपाय म्हणून बांगलादेशाचील प्रशासनाने तब्बल ८ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. विशेषतः देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
रविवारी रात्री बांगलादेशातील सखल भागात रेमाल चक्रीवादळामुळे किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आणि ३० हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. तीव्र चक्रीवादळ रेमाल रविवारी रात्री खेपुपारा आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटावर धडकले. हे वादळ जमिनीवर आल्यानंतर ते कमकुवत झाले आणि अखेरीस त्याचे स्वरुप सौम्य झाले.
लाटा आणि मुसळधार पावसामुळे सुंदरबनचा विस्तीर्ण भाग आणि सातखीरा, खुलना, बेगरहाट, पटुआखा या सखल भागात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शेकडो कोळंबीचे वेडे वाहून गेले आहेत, मोठ्या प्रमाणात घरे आणि उभी पिके नष्ट झाली आहेत. तर झाडे, वीज आणि टेलिफोनचे खांब उन्मळून पडले आहेत. किनारी भागातील अनेक गावेही भरतीच्या लाटेने पाण्याखाली गेली.
हिंसक वादळामुळे बांगलादेशच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडित झाला, रविवारी रात्रीपासून २ कोटींहून अधिक लोकांचा वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. बांगलादेशातील चक्रीवादळामुळे झालेल्या दहा मृत्यूंपैकी सात जणांचा बरिसाल विभागात मृत्यू झाला आणि त्यापैकी बहुतेकांना पडलेल्या घरांच्या किंवा भिंती किंवा झाडांच्या खाली चिरडून जीव गमवावा लागला, असे स्थानिक अधिकारी सांगतात.
खुलना जिल्हा प्रशासन, मोंगला बंदर प्राधिकरण, बांगलादेश नौदल, बांगलादेश कोस्ट गार्ड, अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. खोलना, सतखिरा आणि बागेरहाटमधील सुमारे ६१ किलोमीटरच्या तटबंदीचे अंशतः नुकसान झाले आहे, असे जल विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संततधार पावसामुळे ढाका आणि चट्टोग्राम शहरांच्या काही भागात पूर आला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे किनारपट्टीच्या भागात मोठ्या लाटा उसळण्याचीही शक्यता आहे. या लाटा १२ फुटांइतक्या उंच असतील. सखल भागातील समुद्राची पातळी नेहमीपेक्षा १ ते २ मीटरने वाढण्याचीही शक्यता वरिष्ठ हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती.
एक बोट बुडाली…
आग्नेय पटुआखलीमध्ये अनेक लोक जखमी झाले. बोटीच्या क्षमतेच्या दुप्पट ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक खचाखच भरलेली बोट मोंगला बंदराजवळ बुडाली. हे लोक वादळापासून वाचण्यासाठी दूर जाण्याच्या प्रयत्नात होते.बोट बुडाल्यावर अन्य लोकांनी प्रवाशांना वाचवले, असे पोलिसांनी सांगितले.





