Cyclone Murasu : मध्यरात्री आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार ‘मुरासु’ चक्रीवादळ; अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Cyclone Murasu : चक्रवात ‘मुरासु’ २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते ३ नोव्हेंबरच्या पहाटेदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता. मुसळधार पाऊस, १२० किमी वेगाचे वारे आणि दोन मीटरपर्यंत लाटांचा इशारा.

Cyclone Murasu : बंगालच्या उपसागरात ‘मुरासु’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरच्या रात्री उशिरापासून ३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत हे चक्रीवादळ नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान, ओंगोलजवळ दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी, तर झोतांचा वेग ताशी १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो.
चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेशातील कृष्णा, बापटला, प्रकाशम, एसपीएसआर नेल्लोर, गुंटूर, एलुरु, एनटीआर, पलनाडू आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत होण्याची शक्यता आहे. २ नोव्हेंबरच्या दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.
आंध्रसह तीन राज्यांत अतिवृष्टीचा इशारा –
‘मुरासु’च्या प्रभावामुळे तटीय आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तेलंगणात २ व ३ नोव्हेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. तमिळनाडूत २ नोव्हेंबरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान पाऊस व वादळी वाऱ्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकातही पुढील काही दिवस पावसाचा अंदाज आहे.
समुद्रात दोन मीटरपर्यंत लाटा –
चक्रवाताच्या वेळी समुद्रात सामान्य भरतीपेक्षा सुमारे १.५ ते २ मीटर उंच लाटा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांतील सखल भागात समुद्राचे पाणी शिरण्याचा धोका आहे. तमिळनाडू, पुडुचेरी आणि ओडिशाच्या किनारी भागातही जोरदार वारे व पावसाचा परिणाम जाणवू शकतो.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा –
हवामान विभागाने बंगालच्या उपसागरासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर काय परिणाम?
‘मुरासु’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट मोठा धोका सध्या दिसत नाही. मात्र, त्याच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे काही भागांत ढगाळ वातावरण किंवा हलका पाऊस होऊ शकतो. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष द्यावे.





