‘फेंगल’ चक्रीवादळाचा हाहा:कार, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती

Cyclone Fengal | ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर शनिवारी धडकले. यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील उत्तर भागात, आंध्र प्रदेशात, पुडुचेरी येथील रस्ते, हवाईमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. खबरदारी म्हणून पुडुचेरी व तामिळनाडूच्या किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. सुदैवाने या चक्रीवादळामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.
वादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू तसेच पुडुचेरी येथील प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली होती. तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, वादळ धडकणार असल्याने कोणीही समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असा इशारा देण्यात आला होता.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या ३ डिसेंबरपर्यंत तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
फेंगल चक्रीवादळ धडकण्याच्या शक्यतेमुळे तामिळनाडू सरकारने सतर्कता बाळगत चेन्नईतील शाळा, महाविद्यालयांना ३० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली होती. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि त्यांचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी याबद्दलचा कृती आराखडा तयार केला असून त्यांनी याचा आढावा घेतला. तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
सध्या राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चेन्नईसह काही भागात पाणी तुंबले आहे. त्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच यामुळे चेन्नई विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला. अतिवृष्टीमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच अनेक रस्ते मार्गावर पाणी साचल्याने ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.





