सायबरनामा : स्पूफिंग सायबर क्राइम

सौ. वैशाली मंडपे
स्पॅम कॉल/ फेक कॉल हे शब्द आता मोबाइल वापरणाऱ्या प्रत्येकाच्या बऱ्यापैकी परिचित झालेले आहेत. अनोळखी नंबरवरून फोन किंवा मेसेज करून लोकांना फसवण्याचा सायबर गुन्ह्याचा हा प्रकार. अशा कॉल्सकडे दुर्लक्ष न करता असे नंबर ब्लॉक करून त्याचा रिपोर्ट करणे हे आवश्यक आहे. पण जर तुम्हाला तुमच्याच नंबरवरून फेक कॉल आला तर ?
कॉलर आयडी स्पूफिंग हा असा फ्रॉड आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगार ऍपच्या मदतीने खोटा कॉलर आयडी तयार करतो. याशिवाय कॉलरचा मूळ आवाज बदलून वेगळ्या आवाजात कॉल केला जातो, ज्यामुळे असे गुन्हेगार शोधणं अवघड होतं. स्फुपिंग म्हणजे जेंव्हा कॉलर आपली खरी ओळख लपवण्यासाठी आपल्या कॉलर आयडी डिस्प्लेवर प्रसारित होणारी माहिती बदलून खोटी माहिती देतो. उदा. मोबाइल नंबर, कॉलरचे नाव, कंपनीचा लोगो किंवा कंपनीचे नाव ही खोटी माहिती असते.
अनेकदा ऑनलाइन साइटच्या सारखाच खोटा लोगो तयार करून मोठ्या ऑफरचे मेसेजेस प्रसारित केले जातात. ज्यामध्ये फक्त 9 रूपयांपासून 99 रूपयांइतक्या कमी रकमेमध्ये मोबाइल फोन/ इतर गॅझेट/ ब्रॅंडेड कपडे अशा वस्तूंची खरेदी करण्याची ऑफर असते. ही ऑफर काही तासांपुरतीच असते ज्याला लिमिटेड टाईम ऑफर म्हणतात. त्यामुळे इतक्या स्वस्तात वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण त्या ऑफरच्या सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांची फसवणूक होते.
महावितरणाचा लोगो वापरून पाठवलेले मेसेजेस हा याच प्रकारचा फ्रॉड आहे. अशाच प्रकारे ऍमेझॉनचा लोगो वापरूनही एक खोटी लिंक तयार केली जाते. ज्याच्या मदतीने मोठी सूट दाखवून जर ही ऑफर मिळवायची असेल तर त्या मेसेजमध्ये लिंक दिलेली असते. जेव्हा ग्राहक या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो डमी वेबसाईटवर पोहोचतो. जिथं अत्यंत कमी किमतीमध्ये महागड्या वस्तू मिळत असतात. या साइटवरून खरेदी केल्यानंतर जेव्हा पेमेंट ऑप्शन येतो तेव्हा ग्राहक आपली बॅंक डिटेल्स नकळतपणे फ्रॉड साइटवर माहिती स्वरूपात देतो. अशा वेबसाईटवर वस्तूंच्या किंमती कमी असतात. परंतु शिपिंग चार्जेस 79/99 असे दाखवलेले असतात. पटकन ऑफरचा लाभ घ्यायचा या मोहापायी ग्राहक रिटर्न पॉलिसीविषयी काही दिलं आहे का हे वाचत नाही.
आलेली वस्तू ही अत्यंत खराब दर्जाची असते. परंतु, जेंव्हा ती परत करायला ग्राहक त्या वेबसाइटवर जातो तेंव्हा तिथे रिटर्न पॉलिसीमध्ये नो रिटर्न ऑर रिफंड असा ऑप्शन असतो. त्याशिवाय शिपिंग चार्जेसच्या नावाखाली घेतलेले पैसेही परत केले जात नाही आणि अशा प्रकारे छोट्या वाटणाऱ्या 99 रुपयांच्या शिपिंग चार्जेसच्या माध्यमातून अनेक लोकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक सायबर गुन्हेगार करतात.
खोट्या जॉब ऑफरचे मेसेज, बनावट लॉटरी लागल्याचे मेसेजेस, बॅंकिंग संदर्भातील फेक मेसेजेस, पासवर्ड रिसेट करण्यासंदर्भातील फेक मेसेजेस ही काही स्पूफिंग फ्रॉडची उदाहरणे अशा प्रकारचे मेसेजेस हे काळजीपूर्वक न वाचल्यामुळे तसेच अशा मेसेजेसचा खरे खोटेपणा कसा ओळखायचा याविषयीची माहिती अनेकांना नसल्यामुळे सायबर गुन्हेगार सहजपणे ग्राहकांना फसवतात.
स्पूफिंगपासून वाचण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे
1. तुमच्या ईमेल अकाउंटचा स्पॅम फिल्टर नावाचा ऑप्शन ऑन ठेवणे.
2. तुम्हाला येणारा कॉल जर स्पॅम कॉल म्हणून दाखवत असेल तर असे स्पॅम कॉल आणि मेसेजेस ब्लॉक करून त्यांचा रिपोर्ट करणे. असे मेसेजेस ब्लॉक केल्यामुळे निदान तुमच्यापर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचण्याचा एक मार्ग बंद होतो.
3. तुमची वैयक्तिक माहिती विचारणारा कोणताही मेसेज किंवा ईमेल याची खात्री केल्याशिवाय गोपनीय माहिती ऑनलाइन भरून देऊ नका.
4. चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुमच्या मोबाइल किंवा काम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा.
5. खात्री असलेल्या वेबसाईटवरूनच कोणतीही माहिती डाऊनलोड करा.
6. अनोळखी लोकांनी पाठविलेल्या ई- मेलमधील अटॅचमेंटवर क्लिक करू नका.





