#CWC23 #NEDvBAN : बांगला टायगर्स पुन्हा ढेर! नेदरलँड्सनं केला 87 धावांनी पराभव…

World Cup 2023 BAN vs NED Match Result : विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. नेदरलँड्सने बांगलादेशविरुद्ध चमकदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला. विश्वचषकातील हा त्याचा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता. नेदरलँडचे आता सहा सामन्यांतून चार गुण झाले आहेत. त्याचबरोबर बांगलादेशचे सहा सामन्यांत केवळ दोन गुण झाले असून ते विश्वचषकातून जवळपास बाहेर पडले आहेत.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलँडचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 42.2 षटकांत 142 धावांवर गारद झाला. बांगलादेशचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने सर्वाधिक 35 धावा केल्या.
महमुदुल्लाह आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 20-20 धावा केल्या. महेदी हसनने 17, तनजीद हसनने 15 आणि तस्किन अहमदने 11 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. नझमुल हुसेन शांतो नऊ, शकीब अल हसन पाच धावा करून, लिटन दास तीन धावा करून आणि मुशफिकुर रहीम एक धावा करून बाद झाला. शरीफुल इस्लाम खाते न उघडता नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मिकरेनने चार विकेट घेतल्या. बास डी लीडेला दोन यश मिळाले. आर्यन दत्त, कॉलिन अकरमन आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Netherlands pulled off yet another stellar win in #CWC23 as they beat Bangladesh at Eden Gardens 🤩#NEDvBAN 📝: https://t.co/GrSfCMbzj2 pic.twitter.com/KExeIXi226
— ICC (@ICC) October 28, 2023
तत्पूर्वी, नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. नेदरलँड्सकडून फलंदाजीत कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्यांच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले.
लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त नऊ, शरीझ अहमद सहा आणि विक्रमजीत सिंग तीन धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनला मात्र एक गडी बाद करता आला.





