#CWC23 #INDvENG : विराटच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद; सचिन तेंडुलकरशी साधली बरोबरी…

World Cup 2023 IND vs ENG Match : विराट कोहलीच्या बॅटमधून आणखी एक शानदार खेळी पाहायला मिळेल या आशेने लखनौच्या एकना स्टेडियमवर पोहोचलेल्या चाहत्यांना आज निराश व्हावे लागले. किंग कोहली आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 9 चेंडूंचा सामना केल्यानंतर विराट डेव्हिड विलीच्या चेंडूवर बेन स्टोक्सकडे सोपा झेल देऊन निघून गेला. कोहलीकडून सर्वांनाच अपेक्षा होत्या मात्र त्याला यावेळी साधा भोपळाही फोडता आला नाही.
विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत पहिल्याच चेंडूपासून फॉर्ममध्ये दिसणारा विराट लखनौमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच अडचणीत दिसला होता. ज्या षटकात डेव्हिड विलीने विराटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्या षटकातील पहिले चार चेंडू कोहलीने खेळले होते आणि त्याच्यावरील दडपण स्पष्टपणे दिसत होते. विराट मोठा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला, पण चेंडूचा बॅटशी योग्य संपर्क झाला नाही आणि बेन स्टोक्सने सोपा झेल घेत कोहलीचा डाव संपवला. 9 चेंडूंचा सामना करून कोहली शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
50 षटकांच्या विश्वचषकात विराट कोहली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतासाठी पहिल्या सातमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांपैकी विराट सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली 34व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यामुळे सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिन सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याचवेळी वीरेंद्र सेहवाग 31 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
भारताकडून झहीर खान हा याबाबतीत आघाडीवर आहे. तो 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर इशांत किशन (40), हरभजन सिंग (37), अनिल कुंबले (35), विराट कोहली (34) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (34) असे शून्यावर बाद झाले आहेत.





