#CWC23 #INDvENG : अव्वल क्रमांकाची संधी; टीम इंडियासमोर आज तळातील इंग्लंडचे आव्हान…

लखनौ :- सलग पाच सामने जिंकून भारतीय संघ या विश्वकरंडकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध झाले असतानाच, मागील चॅम्पियन इंग्लंडसमोर आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत रविवारी येथील एकना स्टेडियमवर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचेच वर्चस्व राहिल यात कुठलीही शंका नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड
वेळ-दुपारी 2 पासून
ठिकाण- एकना स्टेडियम, लखनौ
स्पर्धेत आत्तापर्यंत सुमार कामगिरी दाखवलेल्या इंग्लंड संघाचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल क्रमांक गाठण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे. सध्या रनरेटच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले आहेत, तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटची नवी व्याख्या निर्माण करणाऱ्या इंग्लंडसमोर या स्पर्धेत टिकून राहण्याची लढाई आहे.
या सामन्यात भारताला अष्टपैलू हार्दिक पांड्याची उणीव भासेल. साधारणपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर शार्दुल ठाकूरच्या जागी रविचंद्रन अश्विनला मैदानात उतरवले गेले असते, पण पांड्याच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाला केवळ पाच गोलंदाजांसह उतरावे लागणार आहे.
भारताने अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली तर कोणाला वगळले जाणार हा सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण तिसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. यासह विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.





