#CWC23 #ENGvAFG : धावगती वाढवण्याची इंग्लंडला संधी; अफगाणिस्तानविरुद्ध आज सामना

नवी दिल्ली :- सलामीच्या लढतीतील मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंडची विश्वचषक मोहीम पुन्हा रुळावर आली आहे. विश्वचषकाचा विद्यमान विजेतेपदाचा मानकरी इंग्लंड रविवारी(दुपारी 2वाजता) दिल्ली येथे विश्वचषक स्पर्धेत दणदणीत अफगाणिस्तानविरुद्ध वर्चस्व राखण्याच्या सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करेल. या सामन्याद्वारे आपली निव्वळ धावगती अर्थात नेट रनरेट वाढवण्याची संधी त्यांना आहे.
गतविजेत्या इंग्लंडच्या मोहिमेची सुरुवात निराशाजनक झाली. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा नऊ विकेट्सनी पराभव झाला होता. एक प्रकारे मागील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, अस्तित्वात नसलेल्या नियमाच्या आधारे (सर्वाधिक चौकार) इंग्लंडला विजयी घोषित केल्याचा बदला न्यूझीलंडने यावर्षी पहिल्याच सामन्यात घेतल्याचे दिसून आले. पण जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने शैलीत परतफेड करत बांगलादेशचा धर्मशाला येथे 137 धावांनी पराभव केला.
कर्णधार बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनाही मधल्या फळीत भरीव योगदान देऊन स्पर्धेत आपले आगमन चिन्हांकित करायचे आहे. कुचकामी मोईन अलीच्या जागी आलेल्या रीस टोपलीने बांगलादेशविरुद्ध भरपूर फायदा करुन दिला. त्याने त्याच्या 10 षटकांत 43 धावांत चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडला फक्त अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा नाही तर त्यांचा नेट रन रेट वाढवण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे.
अशातच सलगच्या पराभवानंतर अफगाणांचा आत्मविश्वास कमी आहे. अफगाणिस्तानचा बांगलादेशविरुद्ध सहा गडी राखून पराभव झाला आणि यजमान भारताकडून आठ गडी राखून पराभव झाला. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी ते इंग्लंडवर जोरदार आक्रमण करु शकतील. अफगाणिस्तानची मुख्य चिंता त्यांच्या सलामीवीरांची कामगिरी आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये, रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान हे दोन्ही सलामीवीर चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे संघाची पडझड झाली.
गुणतालिकेत इंग्लंड पाचव्या अन् बांगलादेश सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडचा संघाचा रनरेट +0.5 इतका आहे. इंग्लंड संघाला दोन सामन्यात एक विजय आणि एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. श्रीलंकेचा संघ सातव्या तर नेदरलँडचा संघ आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत नवव्या तर अफगाणिस्तानचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि श्रीलंका या चारही संघाला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही.





