#CWC2023 Semifinal : दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नावे जाहीर…

मुंबई :- भारतात सुरु असेलल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक 2023 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यांचा टप्पा रविवारी संपला. आता एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिला उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येत्या बुधवारी (१५ नोव्हेंबर) यजमान भारत व न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (१६ नोव्हेंबर) कोलकाता येथे रंगणार आहे.
भारतात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी आयसीसीने पंच तसेच सामनाधिकारी यांची नावे जाहीर केली आहेत.
भारत व न्यूझीलंड यांच्यातील बुधवारी होत असलेल्या लढतीसाठी रिचर्ड इलिंगवर्थ व रॉड टकर हे मैदानावरील पंच असतील तर तिसरे पंच म्हणून जोएल विल्सन काम पाहतील. आद्रीयन होल्डस्टॉक हे चौथे पंच असून अँडी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी आहेत.
दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य लढतीत रिचर्ड कॅटलबरो व नितिन मेनन हे मादानावरील पंच, ख्रिस ग्रेफेनी हे तिसरे पंच असतील तर, मिचेल गॉफ हे चौथे पंच म्हणून काम पाहतील. सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





