#CWC2023 #INDvBAN : विराट कोहलीचे शानदार अर्धशतक, टीम इंडिया विजयापासून 56 धावा दूर

World Cup 2023 India vs Bangladesh Match Live Score :- आज एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एक जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.
सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि टी हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य आहे.
बांगलादेशच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 34 षटकात 3 बाद 201 धावा झाल्या असून विजयासाठी आणखी 56 धावांची आवश्यकता आहे. सध्या क्रिजवर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 65*(68) धावांवर तर लोकेश राहुल हा 13*(18) धावांवर खेळत आहे.
विराटनं झळकावले ODIतील 69 वे अर्धशतक…
विराट कोहलीने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 69 वे अर्धशतक आहे. कोहलीच्या खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत असून सामना सहज जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
दरम्यान, त्याआधी 29.1 षटकात 178 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. श्रेयस अय्यर 25 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने त्याला महमुदुल्लाहकरवी झेलबाद केले. भारतीय संघाची 132 धावांवर दुसरी विकेट पडली. शुभमन गिल 55 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. मेहदी हसनच्या चेंडूवर महमुदुल्लाहने गिलचा अप्रतिम झेल घेतला.
त्याआधी पॉवरप्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने शानदार फलंदाजी केली. मात्र, त्यानंतर 12.4 षटकात धावसंख्या 88 असताना भारताने पहिली विकेट गमावली. रोहित शर्माचे अर्धशतक 2 धावेनं हुकले. रोहित शर्मा 40 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा काढून बाद झाला. हसन महमूदच्या चेंडूवर तो तौहीद हृदोयकरवी झेलबाद झाला.
तत्पूर्वी, सलामीवीर फलंदाज लिटन दास आणि टी हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला.
पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 137 अशी झाली होती. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली.
भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो पुढे गोलंदाजी करू शकला नाही.
हार्दिक पांड्याला दुखापत…
या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता समजू शकलेली नाही, मात्र त्याला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेलं असून त्याचे दुसऱ्या डावात फलंदाजीला येणे कठीण दिसत आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत स्कॅनिंगनंतरच स्पष्टता येणार आहे. हार्दिक पांड्याची दुखापत भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.





