#CWC2023 #INDvBAN : बांगलादेशनं Toss जिंकला, अन् घेतला ‘हा’ निर्णय…

World Cup 2023 IND vs BAN Toss : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील प्रचंड भरात असलेला भारतीय संघ पुणे येथे होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत सलग चौथा विजय साकार करण्यासाठी सज्ज बनला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताने सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीकडे कूच केलेली आहे. पहिल्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानलाही पराभूत केले.
पुण्याच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्यांदाच आमनासामना होत आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुुुुरू होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा बांगलादेश संघाच्या बाजूनं लागला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Team Bangladesh have elected to bat against #TeamIndia) नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे.
शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक(Toss) जिंकला असता तर मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान होत नाही. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान,एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत, यामध्येही टीम इंडियाचे वर्चस्व राहिलेले आहे. भारताने 3 सामने जिंकले आहेत तर बांगलादेश संघाला केवळ एका सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आले आहे.
विश्वचषक 2007 : बांगलादेश 5 गडी राखून विजयी
विश्वचषक 2011 : भारत 87 धावांनी विजयी
विश्वचषक 2015 : भारत 109 धावांनी विजयी
विश्वचषक 2019 : भारत 28 धावांनी विजयी
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात 35 वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 31 एकदिवसीय सामने जिंकले आणि बांगलादेशने 8 सामने जिंकले, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.





