Bhojraj Nag : लिंबू कापला पाऊस थांबवला! भाजप खासदाराचा अजब दावा, काँग्रेसने उडवली खिल्ली, नेमकं काय घडलं?
Bhojraj Nag : डौंडीलोहारा येथे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या उपस्थितीत महतारी वंदन योजनेचा ३१ वा हप्ता जारी करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Bhojraj Nag : छत्तीसगडमधील कांकेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार भोजराज नाग यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बालोद जिल्ह्यातील डौंडीलोहारा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी देवाकडे प्रार्थना करून आणि लिंबू कापून पाऊस थांबवल्याचा अजब दावा केला.
खासदारांचा हा दावा ऐकताच मंचावर उपस्थित मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह इतर नेत्यांनाही हसू आवरता आले नाही. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डौंडीलोहारा येथे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या उपस्थितीत महतारी वंदन योजनेचा ३१ वा हप्ता जारी करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या आधीपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कार्यक्रमावरही हवामानाचे सावट होते. खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेबाबतही काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना खासदार भोजराज नाग यांनी हवामानाचा एक किस्सा सांगितला.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याचा प्रोटोकॉल रात्री १२ वाजता जारी झाला होता. मात्र, सोमवारपासूनच हवामान खराब असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आपण देवाकडे प्रार्थना केली आणि त्यानंतर लिंबू कापले. त्यानंतर पाऊस थांबला.”
खासदार भोगराज नाग यांच्या दाव्याची जोरदार चर्चा
खासदारांच्या या अजब दाव्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदारांच्या या अजब दाव्यावरून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
काँग्रेसने उडवली खिल्ली
या दाव्यावरुन काँग्रेसने भोजराज नाग यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बैज यांनी त्यांच्या दाव्याची खिल्ली उडवत अंधश्रद्धा आणि चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. बैज म्हणाले, “जर लिंबू कापल्याने पाऊस थांबत असेल, तर त्यांनी साखरेचे भाव आणि महागाई कमी करण्यासाठीही लिंबू कापावे.” खासदार भोजराज नाग यांच्या या दाव्यामुळे डौंडीलोहारा येथील शासकीय कार्यक्रमातील हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का.! तब्बल ‘इतक्या’ हजार बहीणींची ओवाळणी हुकली





