Ethanol petrol : पेट्रोल पंपांवर मिळणार पर्याय: वाहनानुसार निवडता येणार इथेनॉल मिश्रित पेट्रोल, जाणून घ्या सरकारची नवी योजना
Ethanol petrol : देशातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात पेट्रोल पंपांवर गेल्यानंतर ग्राहकांना आपल्या वाहनाच्या इंजिनच्या क्षमतेनुसार पेट्रोल निवडता येणार आहे.

Ethanol petrol : देशातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात पेट्रोल पंपांवर गेल्यानंतर ग्राहकांना आपल्या वाहनाच्या इंजिनच्या क्षमतेनुसार पेट्रोल निवडता येणार आहे. सरकार पेट्रोल पंपांवर ‘E20’ पासून ‘E30’ पर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करत आहे. मात्र, अधिक इथेनॉलमुळे मायलेज कमी होणे आणि जुन्या इंजिनच्या सुट्या भागांचे नुकसान होणे, यांसारख्या चिंतेमुळे ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम आहे.
या नवीन योजनेतंर्गत वाहन मालक स्वतःच्या कार किंवा बाईकच्या इंजिनच्या अनुकूलतेनुसार किती टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल हवे आहे, याचा निर्णय घेऊ शकतील. एका अहवालानुसार, सरकारने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांसह जिओ-बीपी, नायरा एनर्जी आणि शेल या खासगी कंपन्यांनाही E20, E22, E25 आणि E30 इंधन विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, E20 पेट्रोलमध्ये ८० टक्के शुद्ध पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉलचे मिश्रण असते.
भारतीय मानक ब्युरोने (BIS) नुकत्याच जारी केलेल्या नवीन इथेनॉल मिश्रण मानकांनंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच, पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना परवानगी देण्याच्या सरकारच्या एप्रिल महिन्यातील प्रस्तावानंतर ही नवीन योजना समोर आली आहे.
ग्राहकांच्या मनात दोन मोठ्या चिंता –
नवीन इंधनाबाबत बाजारपेठेत सातत्याने चर्चा सुरू असून, ग्राहकांमध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या चिंता दिसून येत आहेत.
पहिली चिंता (मायलेज): शुद्ध पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची ऊर्जा घनता (Energy Density) कमी असते. याचा अर्थ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण जितके जास्त असेल, तितके वाहनाचे मायलेज कमी होण्याची शक्यता असते. मात्र, E20 मुळे वाहनाचे परफॉर्मन्स आणि पिकअप सुधारतो, तसेच मायलेजमध्ये फार मोठी घट होत नाही, असा दावा सरकारने केला आहे.
दुसरी चिंता (इंजिनचे नुकसान): वाहन जुने असल्यास, अधिक इथेनॉल असलेले पेट्रोल इंजिनमधील रबरचे पार्ट्स, पाईप्स आणि प्लास्टिकच्या उपकरणांना नुकसान पोहोचवू शकते. इथेनॉलमध्ये आर्द्रता (नमी) शोषून घेण्याची प्रवृत्ती असल्याने इंजिनला गंज लागण्याचा धोका असतो.
पेट्रोल पंपांवर करावे लागणार ‘हे’ बदल –
देशभरातील सुमारे एक लाख पेट्रोल पंपांवर ही नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी काही बदल करावे लागतील. वेगवेगळ्या मिश्रणाचे पेट्रोल विकण्यासाठी पंपांवर स्वतंत्र डिस्पेंसिंग नोजल, भूमिगत साठवणूक टाक्या (Underground Storage Tanks) आणि ब्लेंडिंग कंट्रोल सिस्टम बसवावी लागणार आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हा बदल फारसा खर्चिक किंवा गुंतागुंतीचा नाही. सध्याच्या डिस्पेंसिंग सिस्टमचाच (ज्यामध्ये प्रीमियम, रेग्युलर आणि डिझेलचे नोजल असतात) विस्तार केला जाऊ शकतो. याचा साठवणूक आणि टाकीचा खर्च तेल कंपन्या स्वतः उचलणार आहेत. ग्राहकांचा गोंधळ उडू नये, यासाठी पेट्रोल पंपांवरील मशीनवर कोणते वेरिएंट विकले जात आहे, हे स्पष्ट अक्षरात लिहावे लागेल आणि त्यांचे दरही वेगळे दाखवावे लागतील.
देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर पाऊल –
सध्याच्या जागतिक तेल संकटामध्ये भारताचे हे पाऊल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आकडेवारीनुसार, इथेनॉल मिश्रणाचे फायदे (नोव्हेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०२६) मध्ये दिसून आले आहेत. त्यानुसार विदेशी चलनाची ₹१.७ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. कार्बन उत्सर्जनात घट: ८.७ कोटी टन (सुमारे ३५ कोटी झाडे लावण्याइतके) झाली आहे. मार्च २०२६ पर्यंत देशातील इथेनॉल उत्पादन वाढून २० अब्ज लीटर झाले आहे.
सध्याच्या २० टक्के (E20) मिश्रणासाठी केवळ ११ अब्ज लीटर इथेनॉलची आवश्यकता आहे. त्यामुळे देशातील ही अतिरिक्त उत्पादन क्षमता उपयोगात आणण्यासाठी आणि शेतकरी तसेच साखर कारखान्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी E22 आणि E30 सारखे पर्याय बाजारात आणणे गरजेचे झाले आहे.
इथेनाॅल कशापासून तयार केले जाते ?
इथेनॉल (एक प्रकारचे अल्कोहोल) हे प्रामुख्याने नैसर्गिक आणि जैविक स्रोतांपासून बनवले जाते. भारतात ते तयार करण्यासाठी खालील घटकांचा वापर होतो.
उसाचा रस आणि मळी: भारतात सर्वाधिक इथेनॉल उसापासून बनवले जाते. साखर कारखान्यात साखर तयार करताना निघणाऱ्या ‘मळी’वर (Molasses) किंवा थेट उसाच्या रसावर प्रक्रिया करून त्याचे किण्वन (Fermentation) केले जाते.
खराब झालेले अन्नधान्य: तांदूळ, मका, गहू आणि ज्वारी यांसारख्या पिकांच्या खराब झालेल्या किंवा अतिरिक्त साठ्यापासूनही इथेनॉल तयार केले जाते. या धान्यांमधील स्टार्चचे रूपांतर साखरेत करून इंधन बनवले जाते.
शेतकऱ्यांचा फायदा: या प्रक्रियेमुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांना त्यांच्या पिकाला व अतिरिक्त मालाला चांगला भाव मिळतो, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते.





