चालू खात्यावरील तूट नियंत्रणाखाली – वाणिज्य मंत्रालय

मुंबई – मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी ही तूट सेवा क्षेत्राने भरून काढली आहे. त्यामुळे भारताची आयात आणि निर्यातीतील दरी फारशी वाढलेली नाही. त्यामुळे चालू खात्यावरील तूट नियंत्रणात असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ज्या प्रमाणात आयात वाढत आहे त्याच प्रमाणात निर्यातही वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश मिळत आहे. भारताची सेवा क्षेत्राची निर्यात 175 ते 200 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयात आणि निर्यातीमधील तफावतीचा विचार केला तर चालू खात्यावरील तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ एक टक्के इतके भरते. ती तूट जास्त नाही असे सांगण्यात आले.
प्रत्यक्ष आकडेवारीनुसार एप्रिल ते जून या कालावधीत चालू खात्यावरील तुट 9.7 अब्ज डॉलर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.1% इतकी भरली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही तूट 8.9 अब्ज डॉलर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% इतकी होती. मात्र आगामी काळामध्ये जागतिक आणि देशातील परिस्थिती सुधारून निर्यात वाढेल आणि ही तूट अपेक्षेपेक्षा कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




