अकोल्यात 1 ते 6 जून संचारबंदी

अकोला – लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून लॉकडाउन वाढवला जाणार की नाही याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता अकोल्यात 1 ते 6 जून दरम्यान संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अकोला करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना अकोल्याचे पालकमंत्री बच्च कडू म्हणाले, सार्वजनिक स्तरावर क्वारंटाइन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचे मूल्यांकन केले जाईल. मूल्यांकनात काही चुकीचे आढळले, तर थेट कारवाई केली जाईल. मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. 1 ते 6 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व बंद असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी त्यांनी सांगिले.
क्वारंटाइन करणे, रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न याला प्राधान्य दिले जाणार आहे. संचारबंदीत मेडिकल तसेच शेतीच्या काही कामांना सवलत देणार आहोत. दरम्यान, अकोल्यात करोनाचे 508 रुग्ण सापडले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे.





