दिवाळी सणाचा सांस्कृतिक वारसा जपायला पाहिजे – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

पुणे – दिवाळी (Diwali) या सणाचा सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. दिवाळी सुखमय, मंगलमय, आनंददायक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या व परिवाराच्या आरोग्याची व सामाजिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा संकल्प करायला हवा आहे. विविध प्रदुषणाला आळा घालण्यासाठी फटाके वाजविण्यावर मर्यादा घातली पाहिजे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj mandhare) यांनी विविध सूचना जारी केल्या आहेत.
आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणांचे अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी हा सण आकाशकंदील, किल्ले, नवनवीन फराळाचे पदार्थ, सुशोभित रांगोळी अशा अनेकविध पध्दतीने साजरा करण्याची परंपरा आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या क्रमामध्ये सगळ्या धनसंपदा, आरोग्य आणि विविध नात्याची प्रेमळ गुंफण दडलेली आहे. या प्रत्येक दिवासाचा आनंद त्या त्या दिवसांप्रमाणे घेणे हीच खरी दिवाळी. मात्र आता दिवाळी सणाला काहीचे भडक स्वरुप आले आहे. अनावश्यक खरेदी, फटाक्याचा धूर व आवाज खरी दिवाळी हरवत चालली आहे.
दिवाळीचा सण (Diwali Festival) साजरा करीत असताना फटाक्यांमुळे निर्माण होणारे आवाज व वायुप्रदूषणाबाबत (Air pollution) विचार होणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचा मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम सर्व सामान्य मनुष्य, प्राणीमात्रांवर होतो. तापमानातील वाढ, समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक आपत्ती, ध्वनी प्रदूषणातील वाढ यामुळे सर्वांचे जीवन सुखमय होण्याऐवजी दु:खमय होताना, ताण-तणावांमध्ये व्यतित होताना दिसून येते.
फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे होणार दुष्परिणाम दूरगामी असल्याचे दिसून आले आहे. घरातील लहान व वृध्द व्यक्तींना विविध जीवघेणे आजार अथवा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे, असे परिपत्रक शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना जारी केले आहे.
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा (killa) मोठा इतिहास आहे. किल्ले तयार करताना आपल्या ऐतिहासिक व भौगोलिक माहितीबरोबरच बांधकाम शास्त्राची ओळख मुलांना होते. मुलांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते. टाकाऊ वस्तुंचा वापर योग्य पध्दतीने करुन सुचकता शिकता येते. किल्ल्यांचे संरक्षण ही आपली जबाबदारी असल्याचे आपोआपच त्यांच्या बालमनावर रुजविले जातात. गडकिल्ल्यांचे संवर्धन व ऐतिहासतिक वारसांचे जतन करणे ही काळाची गरज निर्माण झाली असल्याचेही मांढरे यांनी नमूद केले आहे.





