पिंपरी | अवकाळीच्या सावटाखाली मशागतीच्या कामाने घेतला वेग

कान्हे, {सोपान येवले} – खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शिवारातील पेरणीपूर्वीच्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर, नवनवीन बी बियाणे, शेणखत, रासायनिक खतांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त लागवड पद्धतीचा वापर करून आपल्या आर्थिक उत्पादनात कशी वाढ करता येईल, या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी अवकाळीच्या सावटातच मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. मावळ तालुकयात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीसाठी एकरी दोन हजार रुपये खर्च येत आहे.
बैल जोडीच्या मदतीने अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत करतात. मात्र ज्यांच्याकडे बैल जोडी नाही, त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो. शिवाय बैलजोडीने मशागत करताना अधिक वेळ लागत असतो. त्यामुळे ट्रॅक्टरने शेतीची मशागत केली जात आहे. नांगरणी खोलवर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरद्वारे जमिनीची मशागत करण्यावर दिसून येतो.
उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या काही दिवसांपासून अवकाळीमुळे अगदी पावसाळ्याचा “फील” येत आहे. अवकाळी पावसाच्या सावटातच शेतकरी नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले आहेत. शेतीची मशागत केली जात आहे. शेतातील काडी-कचरा उचलून जमिनी तयार करण्यात येत आहेत. तसेच खतांची व्यवस्था देखील शेतकरी करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून गारपीट, वादळवारा व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती मशागतीची कामे बऱ्याच प्रमाणात खोळंबलेली होती. परिणामी आंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळ परिसरातील शिवारात पेरणीपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.
मावळ तालुक्यातील खरिप हंगामातील पिकांवर अवलंबून असणारे कोरडवाहू शेतकरी तसेच सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकांच्या काढणीची सर्व कामे पूर्ण झाली. नेहमीप्रमाणे मृग नक्षत्रात पावसाचे आगमन झाले की पेरणीला सुरुवात होते.
यासाठी जरी एक महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी सुद्धा लग्नसराईचा हंगाम व मजुरांचा तुटवडा यामुळे शेतकरी आता रखरखत्या उन्हातही खरीप पेरणीसाठी मशागतीच्या कामात व्यस्त दिसून येत आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आधीच खालावलेली आहे. यातच लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पेरणीसाठी धावपळ होऊ नये यासाठी शेतकरी आतापासूनच शेतजमिन मशागतीच्या कामाकडे वळलेले दिसत आहे.
बैलाच्या दावणी रिकाम्या
पारंपारिक पद्धतीने शेतीची नांगरट आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यासाठीच्या बैलजोड्या देखील फार कमी दिसतात. पूर्वी एका शेतकऱ्याच्या दावणीला एक किंवा दोन जोड्या बैल असायचे.
बदलती शेती आणि महागाईमुळे बैलजोड्या टिकविणे जिकिरीचे होऊन बसले आहे. परिणामी ट्रॅक्टरची संख्या वाढली आणि शेतकऱ्यकंच्या दारातील दावणी रिकाम्या झाल्या. त्यामुळे एकप्रकारे ग्रामीण संस्कृतीला घरघर लागली आहे.





