शिमला – हिमाचल प्रदेशातील ओसाड जमीन औषधी वनस्पतींनी बहरणार आहे. मुख्यमंत्री वनविस्तार योजनेंतर्गत 250 हेक्टर (अंदाजे 620 एकर) जमिनीवर आवळा, रेठा, हरड अशा 14 जातींची रोपे लावण्यात येणार आहेत. या योजनेबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
राज्याच्या पर्वतीय प्रदेशातील टेकडीवरील मातीची धूप रोखण्याचाही या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कृतीदल स्थापन करण्यात आले आहे. निवडलेल्या क्षेत्रांची सात वर्षे देखभाल केली जाईल आणि वृक्षारोपण आणि देखभालीचे काम स्थानिक रहिवाशांना आउटसोर्स केले जाईल जेणेकरुन उपजीविकेचे साधन देखील निर्माण होईल असा निर्णय घेण्यात आला.
बिलासपूर, चंबा, हमीरपूर, उना, धर्मशाला, नूरपूर, पालमपूर, कुल्लू, लाहौल, पार्वती, अनी, किन्नौर, मंडी, जोगिंदरनगर, नाहान, सोलन आणि शिमला येथे वृक्षारोपणासाठी 17 ठिकाणेदेखील या प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहेत.
आवळा, रिठा, कचनार, सीसम, खैर, अर्जुन, जांभूळ, बेहडा, हरड, बांबू, मनुका आणि गुलाब या प्रजातींची रोपेही वन विस्तार योजनेंतर्गत लावण्यात येणार आहेत. दक्षिणाभिमुख उतार, खडकाळ प्रदेश आणि शहरांजवळ वृक्षारोपणासाठी वेगवेगळी मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.