पारनेर – तालुक्यातील गुणोरे येथील नितीन उर्फ गोट्या रामदास गोपाळे व त्याचा भाऊ बाळू रामदास गोपाळे यांनी उसाच्या फडामध्ये केलेली गांजाची शेती पारनेर पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारी उद्ध्वस्त केली. शेतामधून 250 किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून बाळू गोपाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुणोरे येथील गाडीलगाव रस्त्यावरील गोपाळे मळ्यात नितीन उर्फ गोट्या गोपाळे याच्या शेतामध्ये उसाच्या फडात गांजाची शेती करण्यात येत असल्याची माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना समजल्यानंतर गायकवाड यांनी पोलिसांचे पथक तयार करून स्वतः गोपाळे मळ्यात छापा टाकला. शेतातील फडामध्ये जाऊन पाहणी करण्यात आली असता तेथे सरीमध्ये गांजाच्या झाडांचे संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गांजाची संपूर्ण झाडे तोडून ती जप्त केली. याप्रकरणी बाळू रामदास गोपाळे यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमंत उगले, गणेश डहाळे, मच्छिंद्र धुमाळ, मयूर तोरडमल व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
वर्षभरापूर्वीची कारवाई बारगळली ?
वर्षभरापूर्वी पारनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गोपाळे याच्या शेतामध्ये आले होते. बराच वेळ थांबल्यानंतर ते निघून गेले. त्यामुळे ही कारवाई गोपाळे याने दडपली असावी, अशी कुजबूज गुणोरे परीसरात सुरू होती.