CSK vs MI : विघ्नेश पुथूरच्या फिरकीची धोनीलाही पडली भुरळ, सामन्यानंतर दिली शाब्बासकीची थाप, VIDEO व्हायरल

CSK vs MI MS Dhoni appreciated Vignesh Puthur : आयपीएल ही भारताची अशी संपत्ती आहे, जी दरवर्षी देशाला नवनवीन प्रतिभावान क्रिकेटपटू देते. यावेळीही आयपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात एका तरुण भारतीय गोलंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा २४ वर्षीय फिरकीपटू विघ्नेश पुथूर. ज्याने मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले.फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच छाप पाडली. ज्यानंतर एमएस धोनीने पण त्याचे कौतुक केले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
विघ्नेश पुथूरच्या जादुई गोलंदाजीसमोर चेन्नईचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विघ्नेशने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३२ धावा देऊन सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा यांच्या विकेट्स घेतल्या. ज्यामुळे सामन्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जचा महान यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी देखील विघ्नेशचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
एमएस धोनीनेही केले विघ्नेश पुथूरचे कौतुक –
VIDEO OF THE DAY ❤️
– DHONI TALKING WITH VIGNESH PUTHUR 🥹 pic.twitter.com/mCP7uMTaYA
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2025
चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकल्यानंतर एमएस धोनी आणि विघ्नेश पुथूर यांची भेट झाली. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील माहीच्या रिअॅक्शनवरुन तो विघ्नेशवर किती प्रभावित झाला होता हे स्पष्ट होते. धोनीने विघ्नेशचे कौतुक केले आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थापही दिली. दोघांमध्ये नक्की काय संवादह झाला हे व्हिडीओ पाहून स्पष्ट झालेले नाही. पण माहीने काहीही सांगितले तरी विघ्नेश ते कधीच विसरणार नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या जागी विघ्नेश प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आला होता.
हेही वाचा – CSK vs MI : चेन्नईने पहिल्याच सामन्यात मुंबईला पाजलं पाणी, ऋतुराज-रचिनच्या अर्धशतकाच्या जोरावर मारली बाजी
मुंबईने सलग १३व्या हंगामातील पहिला सामना गमावला –
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या आणि चेन्नईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले. यजमान संघ चेन्नईने हे लक्ष्य १९.१ षटकांत पूर्ण केले. सीएसकेने आयपीएल २०२५ मधील त्यांचा पहिला सामना ५ चेंडू आणि ४ विकेट्स शिल्लक असताना जिंकला. अशा प्रकारे २०१२ नंतर मुंबईने हंगामातील पहिला सामना जिंकलेला नाही. पहिल्या सामन्यातील हा त्यांचा सलग १३ वा पराभव आहे.





