राज्यातील 200 पैकी 186 साखर कारखान्यांचे गाळप समाप्त; 798.08 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यात 186 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला असून, 843.85 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर 9.46 टक्के उताऱ्यासह 79.80 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते. यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या साखर कारखान्यांनी 843.85 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 798.08 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.46 टक्के इतका आहे.
राज्यात एकूण 186 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. या मध्ये कोल्हापूर आणि सोलापूर विभागाचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. पुणे विभागातील 27, अहिल्यानगर विभागातील 24, छत्रपती संभाजीनगर विभागातील 21, नांदेड विभागातील 26 तसेच अमरावती विभागातील 3 कारखान्याचा समावेश आहे. मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते.
यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 1050.81 लाख टन उसाचे गाळप करून 107.33 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 10.21 टक्के इतका होता. एकूण 149 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.
पुणे विभागात 203.54 लाख टन
पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 203.54 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 195.31 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.6 टक्के आहे. या विभागातील 27 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
अहिल्यानगर विभागात 113.47 लाख टन
अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 113.47 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 100.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.89 टक्के आहे. या विभागातील 24 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.





