Crude Oil : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील क्रूड ऑइल (Crude Oil) साठ्याबाबतची चिंता दूर केली आहे. देशाकडे पुढील 7 ते 8 आठवड्यांसाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलचे (Crude Oil) दर वाढले असले तरी तुर्तास कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचेही माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या ताब्यात 250 दशलक्ष बॅरलपेक्षा अधिक क्रूड ऑइल आणि पेट्रोलियम उत्पादने आहेत. ही रणनीतिक साठवणूक देशाच्या ऊर्जा गरजा सुमारे 7 ते 8 आठवड्यांसाठी भागवण्यासाठी पुरेशी आहे. आता भारत सुमारे 40 देशांकडून तेल आयात करतो, जो एका दशकापूर्वीच्या फक्त 27 देशांपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय इंधनात 20% इथेनॉल मिश्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले असून, वार्षिक सुमारे 44 दशलक्ष बॅरल क्रूड तेलाची बचत होत आहे. यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती वाढवण्याची कोणतीही तात्काळ योजना नाही. सरकार जागतिक तेल बाजारपेठेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताची रिफायनिंग क्षमता देशांतर्गत मागणीपेक्षा जास्त वाढत आहे. यामुळे भारतीय रिफायनर्स युरोपसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन पुरवठा करण्यास सक्षम झाले आहेत. ही क्षमता भारताला जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक मजबूत स्थान देते. दरम्यान, मध्य पूर्वेकडील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारात अस्थिरता असतानाही, रशिया हा भारताचा मुख्य क्रूड ऑइल पुरवठादार कायम आहे. भारत सरकार स्वतःच्या स्वतंत्र खरेदी धोरणावर ठाम असून, या व्यवहारांसाठी बाह्य परवानगीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.