Crude Oil Prices: ट्रम्पच्या एका पोस्टने कच्च्या तेलाचे दर धडाधड कोसळले; सोने-चांदीतही मोठी रिकव्हरी
Crude Oil Prices: सोमवारी सकाळी अमेरिका-इराण तणावामुळे कच्चे तेल, सोने आणि चांदी या तिन्हींवर प्रचंड दबाव होता. मात्र संध्याकाळी ट्रम्प यांच्या एका पोस्टने परिस्थिती पूर्णपणे पालटली. यावरून जागतिक बाजार सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींवर किती संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देत आहे, हे स्पष्ट होते.

Crude Oil Prices: सोमवारी सकाळी ११० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलेले कच्च्या तेलाचे भाव संध्याकाळी अचानक मोठ्या प्रमाणात कोसळले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीजप्रकल्पांवर ५ दिवस हल्ला न करण्याची घोषणा केल्यानंतर ऊर्जा संकट काहीसे निवळण्याची आशा निर्माण झाली आणि कच्च्या तेलाचे भाव वेगाने घसरले. त्याचबरोबर सोने आणि चांदीच्या किमतींनीही सकाळच्या नीचांकावरून मोठी रिकव्हरी केली.
कच्च्या तेलाचे भाव किती घसरले?
सोमवारी संध्याकाळी WTI कच्चे तेल ९ टक्के म्हणजेच ८.७६ डॉलरने घसरून ८९.४७ डॉलर प्रति बॅरलवर आले. तर ब्रेंट क्रूड ८.९७ टक्के म्हणजेच ९.१६ डॉलरने कमी होऊन ९७.१८ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार होत होते. सकाळी हेच भाव ११० डॉलरच्या वर होते, हे लक्षात घेता एकाच दिवसात हे मोठे बदल अनुभवायला मिळाले.
US President Donald Trump posts on Truth Social, “…I have instructed the Department of War to postpone any and all military strikes against Iranian power plants and energy infrastructure for a five day period, subject to the success of the ongoing meetings and discussions” pic.twitter.com/N3Bavc4ylv
— ANI (@ANI) March 23, 2026
भाव का घसरले?
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा अत्यंत सकारात्मक राहिली असून अमेरिकी लष्कराला इराणचे वीजप्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर पुढील ५ दिवस कोणताही हल्ला न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोषणेमुळे ऊर्जा संकट काहीसे कमी होण्याची आशा निर्माण झाली आणि कच्च्या तेलाच्या किमती वेगाने खाली आल्या.
हेही वाचा – सेन्सेक्स 1836 अंकांनी कोसळला, निफ्टी 22,512 वर बंद; टायटन 7% घसरला
सोन्यात मोठी रिकव्हरी –
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर सोन्याच्या किमतींनीही सकाळच्या नीचांकावरून मोठी उसळी घेतली. सोमवारी सकाळी MCX वर सोन्याचा भाव १,२९,५९५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरला होता. मात्र संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता हा भाव २.१३ टक्के म्हणजेच ३,०८३ रुपयांच्या घसरणीसह १,४१,४०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. मध्यपूर्वेतील युद्धाबाबत अशाच सकारात्मक बातम्या येत राहिल्यास सोन्याच्या किमती नीचांकावरून आणखी सावरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
चांदीतही मोठी उसळी –
चांदीच्या किमतींनीही सोन्याप्रमाणेच मोठी रिकव्हरी केली. सोमवारी सकाळी MCX वर चांदीचा भाव १,९९,६४३ रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत कोसळला होता. संध्याकाळी ६.३० वाजता हा भाव ०.६९ टक्के म्हणजेच १,५७२ रुपयांच्या घसरणीसह २,२५,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर आला. ट्रम्प यांचा युद्ध थांबवण्याचा इरादा अधिक स्पष्ट होत असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा वेग कमी केल्याचे दिसून येते.
दरम्यान, सोमवारी सकाळी अमेरिका-इराण तणावामुळे कच्चे तेल, सोने आणि चांदी या तिन्हींवर प्रचंड दबाव होता. मात्र संध्याकाळी ट्रम्प यांच्या एका पोस्टने परिस्थिती पूर्णपणे पालटली. यावरून जागतिक बाजार सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींवर किती संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देत आहे, हे स्पष्ट होते.





