CRPF : सीआरपीएफची परवानगी मिळाल्यानंतर केला विवाह; बडतर्फ जवानाचा दावा

जम्मू : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पाकिस्तानी पत्नीची माहिती दडवल्याबद्दल एका जवानाला बडतर्फ केले. आता त्या जवानाने सीआरपीएफ मुख्यालयातून परवानगी मिळाल्यानंतरच विवाह केल्याचा दावा केला आहे. तसेच, बडतर्फीला आव्हान देण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचे सूतोवाच केले आहे.
मुनीर अहमद असे बडतर्फ जवानाचे नाव आहे. तो एप्रिल 2017 मध्ये सीआरपीएफच्या सेवेत रूजू झाला. त्याने मागील वर्षी मेमध्ये पाकिस्तानी नागरिक असणाऱ्या मीनल खान हिच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ऑनलाइन विवाह केला. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावात आणखीच भर पडली. त्यामुळे मुनीर आणि मीनल हे दाम्पत्य अडचणीत आले.
पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचा आदेश भारताने जारी केला. त्यामुळे मुनीर-मीनल यांच्यासमोर ताटातूट होण्याचे संकट उभे राहिले. पण, न्यायालयाने मीनलला पाकिस्तानला परत पाठवण्यास स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला. अर्थात, तो आनंद मुनीरला बडतर्फ करण्यात आल्याने फार काळ टिकला नाही. पाकिस्तानी महिलेशी विवाहाची माहिती दडवली. पत्नीच्या अवैध वास्तव्याची माहिती दिली नाही. त्या कृती सेवाशर्तीच्या भंग करणाऱ्या आहेत. तसेच, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक आहेत, असे नमूद करत सीआरपीएफने मुनीरची सेवेतून हकालपट्टी केली. त्यामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया जम्मूचा रहिवासी असणाऱ्या मुनीरने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
पाकिस्तानी महिलेशी विवाह करणार असल्याची माहिती मी सीआरपीएफच्या मुख्यालयाला २०२२ यावर्षीच्या अखेरीस दिली. मला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आणि काही औपचारिकता पूर्ण करण्यास सांगण्यात आले. मी स्वत:सह आई-वडील आणि सरपंचांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. सीआरपीएफ मुख्यालयातून मला ३० एप्रिल २०२४ यादिवशी परवानगी मिळाली. त्यानंतर जवळपास महिनाभराने मी ऑनलाइन विवाह केला. त्या विवाहाची छायाचित्रे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र मी माझ्या सीआरपीएफ बटालियनकडे सादर केले, असा दावा त्याने केला. तसेच, न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचेही नमूद केले.





