पिंपरी | पुण्याकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वे, बस स्थानकांवर गर्दी

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – पुणे परिसरातील देखावे आणि आरास पाहण्यासाठी मावळ तालुक्यातून हजारो भाविक रेल्वे आणि पीएमपीएलच्या बस मधून दाखल होत असल्याने रेल्वे स्टेशन आणि बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी होत आहे.
तळेगाव, वडगाव आणि मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेले घरगुती आणि सार्वजनिक गणपती साधारणपणे पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन होत असतात. हे विसर्जन झाल्यावर पुणे आणि परिसरातील गणपती पाहण्यासाठी भाविक पुणे, पिंपरी, चिंचवड कडे नेहमी आकर्षिले जात असतात.
शनिवारी मावळ परिसरातील अनेक मोठ्या गावांमधील सार्वजनिक गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर रविवार, सोमवार, मंगळवार अशा जोडून सुट्ट्या आल्याने अनेक भाविकांनी पुणे आणि मुंबईचे गणपती पाहण्यासाठी धाव घेतलेली आहे.
रेल्वे प्रवासाला पसंती –
पुणे परिसरातील गणपती पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असून बहुतेक सर्वजण रेल्वेच्या उपनगरी गाडीने पुण्याला सायंकाळी जात असतात. रात्रभर गणपती तेथील देखावे, आरास, सजावटी पाहून पहाटे सकाळच्या गाडीने पुन्हा मावळात येत असतात.
पुण्याला जाण्यासाठी लोणावळ्यावरून प्रत्येक तासाला एक याप्रमाणे उपनगरी रेल्वे गाड्या असून त्यांचे प्रवास भाडे देखील अतिशय कमी आहे.
त्यामुळे कमी खर्चामध्ये थेट शिवाजीनगर व पुणे स्टेशनला जाता येते आणिपुण्यातील सर्व गणपतीचे दर्शन घेता येत व आरासही पाहता येते.
पुण्यातील नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई, तुळशीबाग, कसबापेठ, केसरीवाडा आदी मानाच्या आणि महत्त्वाच्या गणपती बरोबरच सदाशिव,
शनिवार, नारायण, गणेशपेठ, कसबापेठ आदी भागातले गणपती पायी पाहता येत असल्याने अनेक भाविक हे रेल्वेने जाण्याचा कमी खर्चात प्रयत्न करतात. तर काहीजण बस सेवेचाही उपयोग करत असतात. शेवटचे काही दिवस गणरायाचे राहिल्याने रेल्वे आणि बसला प्रचंड गर्दी होत आहे.




