जुन्नरमध्ये २७ हजार हेक्टर शेती बाधित

गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी दिली माहिती
जुन्नर – गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील 56 हजार 513 शेतकऱ्यांना फटका बसला असून 27 हजार 523 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी दिली आहे.
तालुका कृषी खाते, महसूल विभाग व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केलेले आहेत. 16 हजार हेक्टर जिरायती, 10 हजार हेक्टर बागायती तर 1615 हेक्टर जमिनीवरील फळबागांचे नुकसान झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे केले असून ही नुकसानभरपाई कधी व किती येईल, याबाबत शेतकरी साशंक आहेत. 2018 साली पडलेल्या दुष्काळात तालुक्यातील सहा मंडलांना शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे बांगरवाडीचे सरपंच जालिंदर बांगर यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्यामुळे बांगर यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.





