स्थापत्यविषयक कामांचा समावेश ः 221 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी – विधानसभा आचारसंहिता लागण्याच्या भीतीने स्थायी समितीने विशेष सभांचा धडाका लावला आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेत तब्बल 221 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये तरतूद वर्गीकरणासाठी 158 कोटी 27 लाख, ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी 139 कोटी तर स्थापत्य विषयक कामांसाठी 62 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी 54 लाख 56 हजार रूपये, पुणे-नाशिक रस्त्याच्या पश्चिम बाजूस स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्यासाठी 27 लाख 50 हजार रूपये, धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळेववस्ती व परिसरामध्ये पावसाळी गटरची सुधारणा करण्यासाठी 27 लाख 49 हजार रूपये, आकुर्डी गावठाणमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी 25 लाख 76 हजार रूपये, विविध विभागांकडील संगणक यंत्रणा देखभाल व दुरूस्तीसाठी 78 लाख 65 हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
“फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महापालिका शाळा, कार्यालये, रूग्णालयांना सौरऊर्जेवर वीजनिर्मितीसाठी 26 लाख 59 हजार रूपये, महाबली चौक ते जुन्या आर.टी.ओ. कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर विद्युत विषयक कामांसाठी 55 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 8 मधील दिवाबत्ती चिखली येथील मोरेवस्ती व सोनवणेवस्ती मुख्य रस्त्यास जोडणारे रस्ते विकसित करण्यासाठी 69 लाख 95 हजार रुपये, मोरेवस्तीतील अंतर्गत भागात ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी 58 लाख 97 हजार रूपये, चिखली येथील सोनवणेवस्ती परिसर औद्योगिक परिसर शेलारवस्ती व औद्योगिक परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी 39 लाख 94 हजार रूपये, पिंपळे गुरव पुलालगत विसर्जन घाट बांधण्यासाठी 57 लाख रुपये, महापालिका हद्दीबाहेर शेवाळवाडी, निरगुडी येथे आवश्यकतेनुसार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 41 लाख 87 हजार, “क’ प्रभागातील जलनिःसारण नलिकांची ठेकेदारी वार्षिक पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढण्यासाठी 1 कोटी 26 लाख 61 हजार रूपये, प्रभाग क्रमांक 19 मध्ये स्टॉर्म वॉटर लाईनसाठी 28 लाख 96 हजार रूपये, तालेरा रुग्णालयातील नवीन इमारतीमधील कॉरीडॉर, सर्व कार्यालयाअंतर्गत स्वच्छतागृहे व बाह्य परिसराच्या साफसफाईसाठी 1 कोटी 87 लाख रुपयांच्या खर्चाचाही समावेश आहे.
ठेकेदारांची दिवाळी “गोड’
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कृपादृष्टीमुळे ठेकेदारांची दिवाळी गोड होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांची रखडलेली 128 कोटींचे बिले देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. 313 कामांपोटी ठेकेदारांना 128 कोटी अदा केले जाणार आहेत. त्यानुसार 313 विकास कामांपोटी 127 कोटी 77 लाख रूपये ठेकेदारांना देण्यात येणार आहेत. यात रस्ते, रस्त्यांचे चर बुजविणे, खड्डे भरणे, खडी मुरुमीकरण, पेव्हींग ब्लॉक, फुटपाथ, स्मशानभूमी, दशक्रीया घाटाची दुरुस्ती, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, नालाबांधणी, नाला दुरुस्ती, इमारत रंगरंगोटी, मंडप व्यवस्था, उद्यान कामे आदीं कामे करणाऱ्या ठेकेदारांचा समावेश आहे.