Kangana Ranaut : ‘Gen-Z’वर टीका करणे कंगना राणावत यांच्या अंगलट; पोलिसांत तक्रार दाखल
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी जेन झीवर टीका करताना काही अयोग्य शब्दांचा वापर केला.

Kangana Ranaut – भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांनी जेन झीवर टीका करताना काही अयोग्य शब्दांचा वापर केला. त्यावरून महिला कॉंग्रेसने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
जेन झीने नुकतेच दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन केले. त्यावेळी काही आंदोलकांनी केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना आक्षेपार्ह स्वरूपाच्या टिप्पणी केल्या. त्याबद्दल संताप व्यक्त करताना कंगना यांनी जेन झीवर टीकेची झोड उठवली. त्यांनी जेन झीचा उल्लेख गटार जनरेशन म्हणून केला.
तसेच, इतर अनुचित शब्दप्रयोगही केले. त्यावर आक्षेप घेत महिला कॉंग्रेसच्या नेत्या अनामिका यादव यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कंगना यांनी जेन झीविषयी अवमानकारक भाषा वापरली.
तसेच, त्यांच्या पालकांचाही अवमान केला. कंगना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. कंगना यांच्या टीकेवरून वादंग निर्माण होऊन विरोधकांनी त्यांच्यावर याआधीच जोरदार पलटवार केला.






