Rahul Gandhi : शब्दांचा घोळ भाजपचा कल्लोळ; शिवजयंतीच्या ट्विटवरून राहुल गांधींवर टीका

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक नेते, अभिनेते आणि दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त करत ट्विट किंवा सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला. हे ट्विट मागे घेऊन जनतेची माफी मागा नाहीतर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा भाजपने दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (19 फेब्रुवारी) पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. पण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटने सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात आली. संबधित ट्विटमध्ये राहुल गांधींनी आपला एक जुना फोटो पोस्ट केला आहे. तसेच, यामध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत.
राहुल गांधींनी फोटोसोबत लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा तसेच पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. पण यामध्ये त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीमुळे भाजपने जोरदार टीका केली.
भाजपाचे राज्यातील नेते, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर यांनी या पोस्टवर टीका करत कायदेशीर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे. तर वचिंत बहुजन आघाडीनेही राहुल गांधी यांना एक्स पोस्टद्वारे टोला लगावला आहे. वंचित बहुजन आघाडीने पोस्टमध्ये म्हटले की, राहुल गांधीजी जयंतीनिमित्त श्रद्धांजली नव्हे, तर अभिवादन करतात. तुम्ही लिहिलेल्या शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे.
माफी मागा आणि अभिवादन व श्रद्धांजली याच्यातील फरक शिकून घ्या. माजी खासदार संभाजी छत्रपती भोसले यांनीही राहुल गांधींच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधींजी जंयतीनिमित्त कुणी श्रद्धांजली व्यक्त करते का?, असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.





