पिंपरी | जरांगेंवरील टीका आणि बंडखोरीची भाषा

पिंपरी, {विशाल कुंभार} – महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे वादळ घोंगावताना दिसत आहे. शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय, तर दुसरीकडे विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.
मावळ विधानसभेत तर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मागील आठवड्यात मावळ भाजपाने विजयाचा संकल्प करणारा कार्यकर्ता मेळावा घेत विधानसभेचे रणशिंगे फुंकले. परंतु, याच मेळाव्यात मावळ भाजपाचे शिर्षस्थ नेते बाळा भेगडे यांनी केलेली दोन विधाने मात्र पक्षासाठी तापदायक ठरतील, असे दिसत आहेत.
मनोज जरांगेंवर टीका
माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे यांनी २ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक वक्तव्य केले होते. ‘मावळच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मावळा म्हणून मी मनोज जरांगे यांना देखील सांगतो.
आपण जर महाविकासआघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातील मराठा समाजाची दिशाभूल करत असाल तर मराठा समाज तुमची मालकी नाही, हे लक्षात ठेवा’ असे वक्तव्य भेगडे यांनी केले. त्यामुळे मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.
विधानसभेला बंडखोरीचे संकेत
महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला मतदारसंघ सोडायचा, असे प्राथमिक जागावाटपाचे सुत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यात विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचे जवळपास पक्के केले आहे.
या सर्व परिस्थितीत बाळा भेगडे यांनी थेट बंडाची भूमिका घेतली आहे. वडगावमधील मेळाव्यात बोलताना बाळा भेगडे यांनी, मावळची जागा भाजपाला मिळाली नाही तर या ठिकाणी सांगलीची पुनरावृत्ती होईल, असा जाहीर इशारा देत बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
पक्षाला फटका बसणार ?
बाळा भेगडे यांनी दिलेले बंडखोरीचे संकेत आणि मनोज जरांगेंवरील टीका यामुळे मावळ भाजपा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पक्षाला जागा न सुटल्यास स्थानिक नेत्यांनी विधानसभेत बंडखोरीचे संकेत दिले. स्थानिक नेत्यांची ही भुमिका पक्षातील वरिष्ठांना तितकी आवडली नाही. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
दुसरीकडे मनोज जरांगे यांच्यावरील टीकेमुळे मराठा समाजाचे पदाधिकारी भाजपावर कमालीचे नाराज झालेत. मावळात मराठा समाजाचा मतदार आहे. संघटनात्मक दृष्टीने तो एकवटलेला देखील आहे. त्यामुळे जरांगेंवरील टीकेचा फटका भाजपाला निवडणूकीत बसू शकतो, असे जाणकार सांगत आहेत.
मावळात भाजपाची सध्याची स्थिती
मावळ विधानसभा हा एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला होता. मात्र २०१९ साली भाजपाने आपली ही जागा गमावली. बाळा भेगडेंना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील शेळके येथे आमदार झाले. शेळके भाजपातून राष्ट्रवादीत येऊन आमदार झाल्याने तालुक्यात भाजपा मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर गेला.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून भाजपा, राष्ट्रवादी सोबत आहेत. मात्र, मावळमधील भाजपा, राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांना ही युती मान्य नसल्याचे दिसत आहे. गेली साडेचार वर्षे आमदार सुनील शेळके यांनी भाजपा कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप भाजपाचे पदाधिकारी जाहीररित्या करत आहेत.
आमदार सुनिल शेळकेंकडून ‘वेट अँड वॉच’
भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची भुमिका यावर आमदार सुनिल शेळकेंनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
भाजपाचा झालेला मेळावा हा कार्यकर्त्यांसाठी होता की मळमळ म्हणून होता हे मला माहिती नाही, असा टोमणा शेळकेंनी लगावला. तर काल परवा त्यांनी, ‘मला वरिष्ठ नेत्यांकडून काही सूचना आल्या आहेत.
या प्रकरणात ‘वेट अँड वॉच’ असे सांगण्यात आले आहे. तुम्ही शांत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जो ठराव केला आहे, त्यामागे काही वेगळे राजकारण आहे,’ असे वरिष्ठांनी सांगितल्याचे आमदार शेळकेंनी माध्यमांना सांगितले आहे.





