पुणे | जिल्ह्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात एकूण ४९ शाळा अनधिकृत असून, त्यापैकी १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्य १२ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेने अनधिकृत शाळांवर कारवाईचा बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रातून मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी केवळ अनधिकृत शाळांची नावे जाहीर केली जात होती. यावेळी प्रत्यक्षात अनधिकृत शाळेवर कारवाई करण्यात येत आहे.
त्यामुळे पालकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. जिल्ह्यात ४९ शाळा अनधिकृत शाळा असल्याचे पुणे जिल्हा परिषदेने यापूर्वीच जाहीर केले आहे. या शाळा पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकांसह ग्रामीण भागात अनधिकृत शाळा आहेत.
या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. एकूण 49 अनधिकृत शाळांमधील 13 शाळा बंद करण्यांत आल्या आहेत.
तसेच अन्य पाच शाळांना मान्यता मिळालेली असून 3 शाळांना शासनाकडून इरादा पत्र प्राप्त झालेले आहे. 14 अनधिकृत शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच 12 शाळांनी दंड भरला आहे. उर्वरित 12 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहे, असेही संजय नाईकडे यांनी सांगितले.
या दहा अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे
1. जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, कामशेत, ता. मावळ. 2. किंग्ज वे पब्लिक स्कूल, रायवूड, लोणावळा, ता. मावळ. 3. ई.एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल, फुरसुंगी, ता. हवेली. 4. रामदास सिटी स्कूल. रामदरा, लोणीकाळभोर, ता. हवेली. 5. ऑर्चिड इंटरनेशनल स्कुल, उंड्री, ता. हवेली. 6. लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, 7. ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, लिंकरोड, चिंचवड, 8. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळेगुरव, 9. पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर, पिंपळे निलख. 10. टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल, कोंढवा खुर्द, पुणे.





