…त्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला पोलीस कोठडी

पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तोंडात घातल्या होत्या नोटा

पुणे – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिवाजीनगर न्यायालयात लाच घेताना अटक केल्यानंतर कनिष्ठ लिपिकाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोंधळ घालत नोटा तोंडात घालून त्यांचा लगदा केला होता. पंचाने नाक दाबून तोंडात बोटे घालून तेथे उपस्थित असलेल्यांसमोर नोटा बाहेर काढल्या होत्या. दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी दिला आहे.

प्रसन्नकुमार गणपतराव भागवत (वय 50, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. याबाबत बिबवेवाडी येथील 31 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. गुरूवारी (दि. 4) न्यायालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदारांच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याची प्रत देण्यासाठी तक्रारदारांना लाच मागण्यात आली. मात्र, लाच देणे तक्रारदारांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

त्यानुसार एसीबीने कारवाई केली. त्याला अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. शाहिद अख्तर, ऍड. पल्लवी वाव्हळ, ऍड. विवेक भरगुडे आणि ऍड. कुमार पागयुडे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.