अमेरिकेत हिंदूंच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहातील भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हिंदू फोबिया, हिंदूंच्या विरोधातील कट्टरता, द्वेष आणि असहिष्णुता यांची निंदा करत प्रतिनिधी सभेत एक प्रस्ताव मांडला आहे. त्यांचा हा प्रस्ताव सभागृहाची छाननी आणि उत्तरदायित्व समितीकडे पाठवण्यात आला आहे. (Crimes Against Hindus Rise in America)
अमेरिकेतील हिंदूंनी सकारात्मक योगदान दिल्यानंतरही हिंदू अमेरिकींना आपल्या परंपरांच्या संदर्भात दुष्प्रचाराचा सामना करावा लागतो आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात छेडछाडीच्या प्रकारांसह भेदभाव, द्वेषयुक्त भाषणे आणि पूर्वग्रहातून प्रेरित असलेल्या गुन्ह्यांना त्यांना तोंड द्यावे लागते आहे.
एफबीआयने दिलेल्या अहवालानुसार हिंदू आणि त्यांच्या मंदिरांना लक्ष्य करण्याच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. त्यासोबतच अमेरिकी समाजात हिंदूफोबिया ( हिंदू विरोधी अथवा हिंदूंबाबत द्वेष अथवा घृणेची भावना) दुर्दैवीपणे वेगाने वाढते आहे असे ठाणेदार यांच्या प्रस्तावात म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात की १९०० नंतर अमेरिकेने जगाच्या सगळ्या भागातून आलेल्या ४० लाख हिंदूंचे स्वागत केले. त्यात विविध वंशांचे, विविध भाषा बोलणारे आणि विविध जातीच्या हिंदूंचा समावेश होता. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक उद्योगात हिंदू समुदायाने दिलेल्या योगदानाचा अमेरिकेला फायदा झाला आहे.
दरम्यान, फाउंडेशन फॉर इंडिया आणि इंडियन डायस्पोरा स्टडीजच्या नीती आणि रणनीती विभागाचे प्रमुख खांडेराव कांड यांनी सांगितले की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच हिंदू भाविकांना भयभीत करण्यासाठी मंदिरांमध्ये चोरी करण्याच्या आणि तोडफोड करण्याच्या घटनांमध्ये अचानक वृध्दी झाली आहे.





