Karad News : सावकाराच्या त्रासाला कंटाळून कामगाराची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल
कराडमधील दिलीप रामचंद्र मुळीक (वय ४५) या बांधकाम कामगाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Karad News) केली.

Karad News : कराडमधील दिलीप रामचंद्र मुळीक (वय ४५) या बांधकाम कामगाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Karad News) केली. व्याजाने घेतलेल्या पैशासाठी सावकारांनी दिलेला त्रासाच्या कारणावरून पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद संबंधित कामगाराच्या पत्नीने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन विनायक मुळे (रा. अंडी चौक, कराड) आणि बशीर पठाण (रा. ओगलेवाडी, ता. कराड) या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडमधील दिलीप मुळीक वाघेरी येथील हॉटमिक्स सिमेंटमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे डबा व पाण्याची (Karad News) बाटली घेऊन कामावर निघाले होते.
त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घर ते कराड शहर पोलीस ठाणे यादरम्यान विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर ते कराड शहर पोलीस ठाण्यात पोहोचले.
पोलिसांनी त्यांना उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना दि. २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या भावाने अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुळीक यांच्या घरी विनायक मुळे आला होता. त्याने दरमहा सहा टक्के व्याजाने दिलेल्या ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी दिलीप मुळीक यांनी ४० हजार रुपये घेतले असून ते परत केल्याचे सांगितले.
मात्र, मुळे याने स्टॅम्प आणि दिलेला चेक आपल्याकडे असून पैसे न दिल्यास चेक बाऊन्सची न्यायालयीन कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिलीप मुळीक(Karad News) यांनी बशीर पठाण याच्याकडून दरमहा नऊ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतल्याचे पत्नीला सांगितले. पैसे परत न केल्याने पठाण याने मुळीक यांची स्कूटी ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पैसे परत केल्यानंतर स्कूटी घेऊन जाण्याचे पठाण याने सांगितल्याचा दावा फिर्यादीत आहे. या दोघांकडून पैशांच्या वसुलीसाठी वारंवार फोन, शिवीगाळ आणि दमदाटी होत असल्याने दिलीप मुळीक मानसिक तणावात होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शोभा मुळीक यांनी फिर्यादित केला आहे. कराड शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.






