Accident: गणपतीपुळ्याकडे निघालेल्या साताऱ्यातील कदम कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात
Accident: पाच जखमी; ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Accident: साताऱ्यातून गणपतीपुळ्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या कदम कुटुंबाच्या कारला कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथे भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जण जखमी झाले असून ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न –
मिळालेल्या माहितीनुसार, मेढा (ता. जावळी) येथील श्रीकांत पांडुरंग कदम हे आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याकडे पर्यटनासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची कार वारूळ फाट्याजवळ आली असता समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
जखमींची नावे –
या अपघातात चालक श्रीकांत पांडुरंग कदम (४४), ज्योती श्रीकांत कदम (३८), पांडुरंग चिमाजी कदम (६५), शारदा पांडुरंग कदम (६०), स्वरा श्रीकांत कदम (१४) तसेच सुधीर नारायण वाघडे (४०, सर्व रा. सातारा) हे जखमी झाले आहेत. यापैकी श्रीकांत कदम व ज्योती कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात आले.
जखमींना तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
ट्रक चालकाची तत्परता –
दरम्यान, समोरून कार येत असल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूच्या डिव्हायडरवर चढवला. त्यामुळे कार ट्रकखाली पूर्णपणे दबली गेली नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. ट्रक चालकाच्या तत्परतेचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
या अपघातानंतर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वारूळ परिसरात अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत असून दिशादर्शक फलकांचा अभाव, अरुंद मार्ग आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या भागात वारंवार अपघात होत असल्याने रखडलेले महामार्गाचे काम हेच ‘मृत्यूचे सापळे’ ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने तातडीने महामार्गाचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली.





