Hadapsar hospital bomb case : हॉस्पिटलमध्ये सापडलेली वस्तू बॉम्बच! एटीएसने ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून धक्कादायक खुलासे
Hadapsar hospital bomb case : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात सापडला लो-इंटेन्सिटी क्रूड बॉम्ब; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात.

Hadapsar hospital bomb case – हडपसर परिसरातील उषा किरण हॉस्पिटल येथे बुधवारी सायंकाळी आढळून आलेली बॉम्बसदृश वस्तू ही प्रत्यक्षात लो इंटेन्सिटी क्रूड बॉम्ब असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडूनही करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रमोद भागवत भालके (२८, रा. वारजे) यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आयसीयूजवळील स्वच्छतागृहात सापडला
फिर्यादीनुसार बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता भालके हे डॉ. विलास गायकवाड यांच्यासह हॉस्पिटलमधील दाखल रुग्णांची पाहणी करत होते. त्या वेळी पहिल्या मजल्यावरील आयसीयू विभागालगत असलेल्या पुरुष स्वच्छतागृहाची लाइट सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लाइट बंद करण्यासाठी गेलेल्या डॉ. गायकवाड यांना वॉश बेसिनखाली संशयास्पद वस्तू दिसली. त्या वस्तूला पांढऱ्या रंगाच्या चार नळकांड्या वायरद्वारे जोडलेल्या होत्या, तसेच त्यावर इलेक्ट्रॉनिक टायमर बसवला होता.
टिक-टिक आवाज आल्याने डॉ. गायकवाड यांनी ती वस्तू काळजीपूर्वक रिकाम्या सलाइन बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भालके यांनी तो बॉक्स रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत हलवला. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन ग्लायडिंग सेंटर परिसरात तपासणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्तूस चार्ज पुरवल्यानंतर त्यामध्ये स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले.
तीन जिलेटीन कांड्या, टायमर
तपासात या बॉम्बमध्ये तीन जिलेटीन कांड्या, टायमर, वायर, इलेक्ट्रिक टेप आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट असल्याचे समोर आले आहे. हा बॉम्ब रात्री १२ वाजण्याच्या सुमारास स्फोट होईल, अशा पद्धतीने सेट केला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
सीसीटीव्हीत संशयित कैद
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती ई-स्कूटरवरून बॉक्स घेऊन हॉस्पिटलमध्ये येताना दिसून आली आहे. त्या आधारे पोलिसांनी एका संशयिताची कसून चौकशी सुरू केली आहे. दुसरा एक संशयित पाच वाजल्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून पाच ते सहा वेळा रुग्णालयात घुटमळताना दिसत होता. त्याचाही शोध सुरू आहे. आतापर्यंत १७ ते १८ संशयीतांची चौकशी केली असून, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
डॉक्टर आणि सोसायटीमधील वाद
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड आणि शेजारील सोसायटीमधील काही कारणांवरून पूर्वीपासून वाद सुरू होते. ते अनेकदा विकोपालाही गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे बॉम्ब दिसल्यानंतर डॉ. गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांनी पथक येईपर्यंत बॉम्बला हात न लावण्याचा सल्ला दिला होता, तरीही डॉक्टरांनी तो बॉक्स स्वतः हलविल्याने त्यांनी एवढा मोठा धोका का पत्करला, याचाही तपास सुरू आहे.
“पोलीस आतापर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत आले नाहीत. बॉम्ब जेथे सापडला तेथे आयसीयू असल्याने नातेवाईकांची दिवसभर वर्दळ असते. यामुळे तपासाला वेळ लागू शकतो.”
– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त






