पुणे : हडपसर भागातील एका रुग्णालयाच्या आवारात बॉम्बसदृश्य वस्तू गुरुवारी आढळून आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांसह बीडीडीएस पथक आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार नेमका काय आहे, याची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णालय हडपसरच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरात आहे. रुग्णालयाच्या आवारात सायंकाळी खोक्यासारखे एक पार्सल आढळले होते. एका व्यक्तीने ते तेथे ठेवून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. काही वेळानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचे बीडीडीएस पथक, अग्निशमन दलाचे पथक, हडपसर पोलिस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. संबंधित वस्तू ताब्यात घेऊन पथकाने ती मोकळ्या जागेत हलवली. नेमकी ती बॉम्ब आहे की अन्य काही वस्तू, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.