Canara Bank : कॅनरा बँकेत 7 कोटींची फसवणूक; दोघांना अटक
जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) एका शाखेत सुवर्ण कर्ज खात्यांमधील दागिन्यांची चोरी करून त्याजागी बनावट दागिने ठेवल्याचा आणि त्याद्वारे ७.३१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे.

Canara Bank : जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) एका शाखेत सुवर्ण कर्ज खात्यांमधील दागिन्यांची चोरी करून त्याजागी बनावट दागिने ठेवल्याचा आणि त्याद्वारे ७.३१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून, या बँकेच्या (Canara Bank) बदनापूर शाखेचा व्यवस्थापक, आणखी एक अधिकारी आणि एका सुवर्ण मूल्यमापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेत (Canara Bank) सुवर्ण कर्जापोटी जमा असलेल्या दागिन्यांच्या पाकिटांचे त्रैमासिक नियमित पुनर्मूल्यांकन सुरू असताना ही घटना उघडकीस आली.
२२ एप्रिल रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांना काही पाकिटांमध्ये बनावट सोने असल्याचे आढळून आले. सुवर्ण कर्जाची २२ पाकिटे बनावट दागिन्यांनी भरलेली होती आणि त्या दागिन्यांचे मूल्य ३.७९ कोटी रुपये होते, असे तपासात निष्पन्न झाले.
याव्यतिरिक्त, बँकेच्या स्ट्राँग रूममधून ३.५२ कोटी रुपये किमतीची सोन्याची ३० पाकिटे गायब असल्याचेही पोलीसांनी सांगितले. २३ एप्रिलच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले असता, बँकेतील एका अधिकाऱ्याने कथितरित्या स्ट्राँग रूममधून सोन्याची पाकिटे चोरून ती लपवल्याचे दिसून आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शाखा व्यवस्थापकाने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला स्ट्राँग रूममध्ये एकटेच प्रवेश करण्याची परवानगी देऊन आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते. तसेच, बनावट सोन्याला खरे सोने असल्याचे प्रमाणपत्र देऊन या फसवणुकीला हातभार लावल्याचा आरोप सुवर्ण मूल्यमापकावरही ठेवण्यात आला आहे.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, बदनापूर पोलिसांनी शुक्रवारी या तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






