Crime News । बारामती शहरात आढळला दोघांचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु…

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील खत्री पवार इस्टेट या इमारतीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाचा गळा व एकाची नस कापलेले अवस्थेत हे मृत्यूदेह आढळून आले आहेत.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी फोनवरून पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेमुळे बारामती शहरात सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन वाघोलीकर व सारिका वाघोलीकर या दोघांचे मृतदेह सदनिकेमध्ये आढळून आले. एकाच्या गळ्याला व एकाची नस कापलेल्या अवस्थेत हे दोघे आढळून आले.
घटनेनंतर तातडीने पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, बारामती शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
सध्या माहिती घेण्याचे काम सुरू असून ही घटना म्हणजे खून, घातपात की आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासाच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी शोध घेत आहेत.





