Crime News: लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा सात वर्षांनी निकाल; आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण तरुणीच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी सलीम शब्बीर शेखची परिस्थितीजन्य पुरावे संशयास्पद असल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी निर्दोष मुक्तता केली.
तब्बल सात वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. अफरोज शेख यांनी काम पाहिले. दरम्यान या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.
हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर होते, मात्र, परिस्थितीजन्य पुरावे संशयास्पद आहेत. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल, त्याचा आयएमईआय क्रमांक आणि मोबाइलच्या रंगाची महिती मिळविली. मात्र, ती कोठून मिळविली. तसेच, आरोपींचे स्केच बनविले.
मात्र, त्यासाठी माहिती कोठून घेतली, हे समजू शकले नाही. खून केल्याची माहिती आरोपींना मित्रांना दिली होती, मात्र, दोन महिन्याच्या कालावधीत ते गप्प का, हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे ॲड. अफरोज शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
काय आहे प्रकरण?
लोणावळ्यात २०१७ मध्ये आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांचे मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.
तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती. हात बांधून तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या.
चोरीच्या उद्देशाने या जोडप्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाचशेहून अधिक नागरिकांची लोणावळा पोलिसांनी चौकशी केली होती.





