शिरूर -न्हावरा-तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कडेला एका व्यक्तीचा खून करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा विद्रूप करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण
विभागाच्या पथकाने चोवीस तासात जेरबंद केले आहे. दादाभाऊ मारुती वाघ (वय 26, रा. निमगाव दुडे, सध्या रा. ढोकसांगवी) असे खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
खंडाळे (ता. शिरूर) येथील कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर हे दि. 15 ऑगस्ट रोजी स्वतःचा वाढदिवस असल्याने दुचाकी घेऊन गेले होते. मात्र ते पुन्हा घरी आले नाही,
त्यानंतर न्हावरा-तळेगाव ढमढेरे रस्त्याचे कडेला पांढरकर हे मृत स्थितीत असल्याचे आढळून आले. याबाबत अंजली कानिफनाथ पांढरकर (वय 35, रा. खंडाळे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली.
गुन्ह्याचा तपास करीत असताना निमगाव दुडे येथील दादाभाऊ वाघ यांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जात दादाभाऊ वाघ याला ताब्यात घेतले. त्यावेळी दादाभाऊ वाघ याने दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कानिफनाथ याचा एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.