Crime : पुसेगावात गॅस कटरने एटीएम फोडून 6.61 लाखांची रोकड लंपास
Crime: सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime – पुसेगाव : सातारा-पंढरपूर महामार्गावरील पुसेगाव (ता. खटाव) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ६१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. चोरीचा पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली.
याप्रकरणी भिकाजी संभाजी लिमकर (वय ४५, रा. उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिमकर हे मुंबईस्थित सीएमएस इन्फो सिस्टम कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
अशी झाली चोरी –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १९ जून) रोजी पहाटे ४.१५ ते ४.३५ या वेळेत ही घटना घडली. अंकुर हॉस्पिटलजवळील जाधव/श्री सेवागिरी कॉम्प्लेक्समधील गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम (आयडी क्र. YPU 8003) कार्यरत आहे. अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून एटीएम केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापून त्यातील ५०० रुपयांच्या १,३२२ नोटा असलेली रोकड ट्रेसह चोरून नेली. या रोकडची एकूण किंमत ६ लाख ६१ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीदरम्यान चोरट्यांनी आपली ओळख लपविण्याच्या उद्देशाने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०५, ३२४(४) व ३(५) नुसार गुन्हा क्रमांक १४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जे. खुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. बी. बर्गे करीत आहेत.





