Ashok Kharat : अशोक खरातच्या फार्महाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा; मोठी माहिती समोर येणार….
खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सपोर्ट मिळत असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

Ashok Kharat – नाशिकमधील हायप्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.
बुधवारी त्याला अटक झाली असून 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासाकरीता वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन केली आहे.
अशोक खरात या भोंदू बाबाविरोधात नाशिक मधील सरकारवाडा पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 28 वर्षीय महिलेने अशोक खरात या भोंदू बाबाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन बुधवारी, 18 मार्च रोजी पहाटे 3 वाजता गुन्हे शाखेने कॅप्टन अशोक खरातला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह्य व्हिडिओ हस्तगत करण्यात आले आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, अशोक खरात याने त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा केला.
मंत्रतंत्र यांच्या नावाखाली अनेक महिलांचा विश्वास संपादन केला. त्याने त्याच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून गुंगी येईल असे पदार्थ खायला देऊन त्यांच्यावर अत्याचार केला. हा प्रकार 2022 पासून सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर या बलात्काराचा आरोपी असलेल्या अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामुळे चाकणकर अडचणीत आल्या आहेत.
पोलिसांनी अशोक खरात याच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे, त्यामध्ये राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी यांच्यासोबतचे व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
तेजस्विनी सातपुते करणार तपास :
खरात याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा सपोर्ट मिळत असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
यानंतर राज्य सरकारने कॅप्टन खरात प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्त्वातील एसआयटी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे.






