पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेने आंदेकर टोळीविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत खंडणी, शस्त्रसाठा व संघटित गुन्हेगारी प्रकरणातील फरार आरोपीस अटक केली असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १४९/२०२४ (भा.न्या.सं.क. १०९, १८९(२), १८९(४), १९१(२)(३), १९०, १२६(२), ३५२, ३५१(३), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) कलम ३(१)(ii), ३(२), ३(४)) अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी गणेश उर्फ सुरज अशोक वड़ा ( ३०, रा. मंगळवार पेठ, पुणे) हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. खंडणीविरोधी पथक-२ गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार दिलीप गोरे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, खंडणीविरोधी पथक-१ पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल आव्हाड व मयुर भोकरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे गावठी पिस्टल आहे. चौकशीत तन्मय कांबळे यास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात नानापेठ, पुणे येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे शस्त्रसाठा असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट-१ ने कारवाई करत विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून ८० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्टल, २ हजार रुपये किमतीची लोखंडी धारदार कुकरी, १५ हजार रुपये किमतीचे एअर पिस्टल, ४० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा मोपेड स्कूटर व इतर साहित्य असा एकूण १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर यांच्या “हिच आईची इच्छा” या नानापेठ येथील राहत्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता चांदीचे दागिने, आयकर विवरण कागदपत्रे (सूर्यकांत आंदेकर, वनराज आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांच्या नावाची), जमिनी व दुकानांचे करारनामे, वनराज असोसिएट्स प्रमोटर्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, महेश महिला नागरी सहकारी पतसंस्था यासंदर्भातील कागदपत्रे, स्टॅम्प पेपर्स, महारेरा व मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, तसेच १७ लाख १५ हजार २६० रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ३६ लाख ६७ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक आरोपी अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ विजय कुंभार, गुन्हे-२ राजेंद्र मुळीक, गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत खंडणीविरोधी पथक १ व २ तसेच युनिट-०१ गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, आश्विनी जगताप, अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे , पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, राम पारवे, राहुल मखरे व इतर पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.