ICC Test Rankings : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी जो रूटला किंचित नुकसान झाले असले तरी तो अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे. भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल हे सध्या कसोटी सामन्यांपासून दूर आहेत, मात्र त्यानंतरही त्यांना फायदा होताना दिसत आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांची क्रमवारीत घसरण झाली असून तो आता टॉप 10 मधून बाहेर पडला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग आता 899 वर पोहोचले असून केन विल्यमसन आणि रूटच्या रेटिंगमधील अंतर कमी झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत जो रूट फलंदाजीत अपयशी ठरला, त्यामुळे त्याला थोडासा तोटा सहन करावा लागला.
केन विल्यमसनही दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या 859 आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 768 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर तर स्टीव्ह स्मिथ 757 रेटिंगसह क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर कायम आहे. म्हणजेच या सर्व खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
रोहित-विराटसह यशस्वीला झाला फायदा…
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 751 च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. यशस्वी जैस्वाल आता 740 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. विराट कोहली आता 7 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 737 आहे. त्यानेही एका स्थानाची झेप घेतली आहे. म्हणजेच भारतीय संघातील या सर्व खेळाडूंना कसोटी न खेळताच फायदा झाला आहे. आता हे सर्वजण 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत मैदानात दिसणार आहेत.
हॅरी ब्रूक टॉप 10 मधून बाहेर तर बाबरने घेतली झेप…
ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याचे रेटिंग आता 728 झाले असून तो आठव्या क्रमांकावर आला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवानही न खेळता एका स्थानाच्या फायद्यासह 9व्या क्रमांकावर आहे, त्याचे रेटिंग 720 आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेनही याच रेटिंगसह नवव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 12 वरून 11 व्या क्रमाकांवर आला आहे. त्याचे रेटिंग 712 आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे सात स्थानांचे नुकसान झाल्याने या सर्व फलंदाजांना फायदा झाला आहे. आता तो टॉप 10 मधून बाहेर पडला आहे. त्याचे रेटिंग 709 इतके असून तो 5व्या स्थानावर थेट 12 व्या स्थानावर आला आहे.