“क्रिकेट आता खेळ राहिला नसून फक्त बिझनेस झाला”; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Supreme Court on Cricket | क्रिकेट आणि इतर क्रीडा प्रकारांच्या वाढत्या व्यावसायिकीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भाष्य करत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने जबलपूर येथील क्रिकेट संघटनांच्या वादाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ‘क्रिकेट हा आता खेळ राहिला नसून फक्त बिझनेस झाला आहे,’ अशी टिप्पणी केली आहे. तसेच क्रिकेटसह इतर खेळांशी संबंधित वादांमध्ये आता हस्तक्षेप न करणेच योग्य ठरेल, असेही स्पष्ट निरीक्षण सुनावणीच्या वेळी न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने क्रिकेटबाबत केले.
न्यायालयात सातत्याने क्रिकेट तसेच खेळांबाबतच सुनावणी सुरू आहे, याकडेच न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. ‘आज आपण क्रिकेटच खेळत आहोत. तीन-चार तरी प्रकरणे झाली. त्यातील एक तर पुढच्या फेरीपर्यंत स्थगित झाले. हे दुसऱ्यांदा घडले. अजून दोन प्रकरणे शिल्लक आहेत. आज किती कसोटी सामने होणार आहेत,’ अशी संतप्त विचारणा न्या. नाथ यांनी वकिलांना केली.
क्रिकेट हा खेळ राहिला नाही…
याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले की, “देश क्रिकेटच्या आहारी गेला आहे. त्यावर न्यायमूर्ती नाथ म्हणाले, “क्रिकेट हा खेळ राहिला नसून आता फक्त बिझनेस झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता क्रिकेटसह सर्वच खेळांच्या सुनावण्यांपासून दूर रहायला हवे. आता या न्यायालयाने क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा खेळांपासून हात झटकण्याची वेळ आली आहे, या प्रकरणाच्या सुनावणीत रस नाही.”
काही विशिष्ट चिंतेमुळेच ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात येत आहेत. या सर्व बाबींमध्ये आता पैशांचे आणि स्वार्थाचे गणित खूप वाढले आहे, ही प्रमुख अडचण असल्याचे वकिलांनी नमूद केले. त्यानंतर खंडपीठाने याचिका ऐकून घेण्यास असमर्थता दर्शवली. तसेच याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी ती मागे घेण्याची परवानगी मागितली आणि ती न्यायालयाने दिली. Supreme Court on Cricket |
हेही वाचा:
शेअर बाजार तेजीत ; सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला, निफ्टी २५१६० च्या पुढे





