क्रिकेट कॉर्नर : विंडीजला आत्मपरीक्षणाची गरज

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होत असतानाच यजमान वेस्ट इंडिजचा संघ नकारात्मक मानसिकेतने सहभागी झाल्याचे उघड दिसत होते.
एकतर विश्वकरंडक स्पर्धेची पात्रताही मिळवू न शकलेला हा संघ पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून भांबावलेला दिसला. आता त्यांना महान क्रिकेटपटू ब्रायन लाराच्या मेंटॉरशीपखाली आत्मपरीक्षण करण्याचीच जास्त गरज आहे.
या कसोटी मालिकेतील भारतीय गोलंदाजी तशी भीतीदायक वगैरे अजिबात नव्हती; परंतु पहिल्या कसोटीत विंडीजच्या फलंदाजांनी याच गोलंदाजीचा बागुलबुवा केला व स्थिरावल्यावरही आपल्या विकेट चक्क फेकल्या. दुसऱ्या कसोटीत त्यांनी थोडीफार जीगर दाखवली. मात्र, त्यात त्यांच्यापेक्षा खेळपट्टीचे कतृत्व जास्त होते. एकदम सपाट व पाटा खेळपट्टी दिल्यावर नुकतीच हाती बॅट धरायला शिकलेला मुलगाही काही चेंडू टोलवेल तसाच काहीसा हा प्रकार होता.
क्रेग बर्थव्हाइटने चांगली खेळी केली. मात्र, इथेच ते वारंवार चुकत आहेत. त्यांना चेंडू खेळून काढता येतात. मात्र, त्यावर धावा करणे कठीण जाते. हे चेंडू चांगले असतात म्हणून नव्हे तर चेंडू फटकावण्याची टीपीकल वेस्ट इंडियन फलंदाजांची जी बेदरकार वृत्ती त्यांच्या पूर्वीच्या फलंदाजांकडे होती ती आताच्या फलंदाजांमध्ये दिसत नाही. त्यांच्या पराभवाचे हेच मूळ कारण आहे. ते जोपर्यंत बेदरकार होते तोपर्यंतच ते या खेळाचे राजे होते.
तंत्र आणि शिस्तबद्धता शिकले आणी त्यांच्या क्रिकेटची वाट लागली. पूर्वी सर विव्हियन रिचर्डसला गोलंदाजी करताना गोलंदाज घाबरायचे, लारासमोर ग्लेन मॅकग्रा किंवा वासीम आक्रमही बावचळायचा. आता त्यांचेच फलंदाज रवीचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा किंवा महमद सिराजसमोर सपशेल शरणागती पत्करतात हे विंडीज क्रिकेट नव्हे.
लाल चेंडूवर चौकार व षटकार इतक्या सामान्यपणे मारणारे फलंदाज त्यांच्या संघातून कुठे गायब झाले. त्यांच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेट सोडून राजकारणात कधीपासून प्रवेश केला इथपासून ते सेकंड बेंच तयार करण्यासाठी परदेशी लीगकडे जाणारे खेळाडू कसे थांबवता येतील या सगळ्याच गोष्टींकरता त्यांना आता आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.





