क्रिकेट कॉर्नर : वॉशिंग्टनला संभाळायला हवे…

भारत व न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यात सुरु आहे. मात्र, त्यात पुन्हा एकदा भारताची फलंदाजी ढेपाळली. १५६ धावंवर आपला पहिला डाव संपूष्टात आला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर ४६ धावांवर आपला पहिला डाव कोसळला होता. इथे जेमतेम दीडशे धावा करता आल्या. काय व कुठे चुकत आहे तेच कळत नाही. जागतिक दर्जाची फलंदाजी अशी मिरवणे आता भारतीय संघालाच भोवत आहे.
काय नाहीये या संघात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे फलंदाज संघात असातानाही ही अशी फलंदाजी पाहावत नाही. समाधानाची गोष्ट ही की, आपणही त्यांच्या धावसंख्येला आळा घलण्यात यशस्वी ठरलो. वॉशिंग्टन सुंदर या गोलंदाजाने न्यूझीलंडची पाळेमुळे खोदून काढली. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्याचकडेच सातत्याने चेंडू सोपवत आहे हे अनाकलनीय आहे. तो बळी घेत आहे म्हटल्यावर त्यालाच सारखे गोलंदाजीला बोलवायचे असले उद्दोग बंद करायला हवेत, तरच त्याची कारकीर्द वाढेल.
पुण्याच्या खेळपट्टीवर त्याने सात बळी घेत आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली व संघातील निवड सार्थ ठरवली. त्याची गोलंदाजी न्यूझीलंडच्या संघाला झेपलीच नाही. डेव्हन कॊन्व्हे व रचिन रवींद्र यांनाच काय ती अर्धशतके फटकावता आली. बाकीच्या फलंदाजांनी सुंदर समोर नांगी टाकली. ऑन पिच व ऑफ द फिच गोलंदाजी करत त्याने खेळपट्टीवरील क्रीझचा सुरेख वापर केला. त्याच्याकडे टॉप स्पीन आहे, रॉंंग वन आहे, स्लोअर वन आहे. त्याच्या भात्यात एकापेक्षा एक सरस चेंडू आहेत, त्यातच त्याची उंची आणखी घातक ठरत आहे. त्याने बाउन्स चेंडूही पहिल्या स्पेलमध्ये टाकले, त्यामुळेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आट्यापाट्या खेळायला लावले. मात्र, त्याला सांभाळले पाहीजे, तरच त्याची कारकीर्द वाढेल व वाचेल.
एका फिरकी गोलंदाजाला एका कसोटीत जास्तीत जास्त २५ षटके टाकायला हवीत मात्र, त्यापेक्षा जास्त षटके टाकायला लावणे चुकीचे आहे. त्याला पहिल्या डावात २३ षटके टाकयला लावली, परंतू ती देखली जास्त ठरत आहेत, हे त्याच्या देहबोलीतून सहज दिसत होते. त्याच्या बोटांवर दबाव आला होता, हे देखील स्पष्ट जाणवत होते. एक ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन संघात असताना सुंदर २३ षटके गोलंदाजी करतो हे पहिल्यांदाच पाहिले. अश्विन अनुभवी आहे. त्यानेच जास्ती जास्त षटके टाकायला हवीत.
येत्या काळत जरी सुंदर यशस्वी ठरला, तरी त्याच्यावर ताण येणार नाही हे रोहितने पाहिले पाहिजे. एक बळी त्याने घेतला म्हणून त्यालाच सारखी गोलंदाजी देणे चांगले नाही. गोलंदाजीचा हात (बॉलिंग आर्म) दुखावला गेला तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. खेळपट्टीवर गवत नसले की फिरकी गोलंदाज यशस्वी ठरतात हे उघड आहे. मात्र, तेच गृहित धरनेही उपयोगी नाही. जूना चेंडु जसप्रीत बुमराहला सोपवला गेला तरच तो रिव्हर्स स्विंगचा वापर करेल. त्याला चेंडू न सोपवून रोहितने चुक केली व त्याचा ताण सुंदरवर आला. भविष्यात या गोष्टींकडेही लक्ष दिले गेले पाहीजे. ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने ग्लेन मॅकग्राथचा अस्त्र म्हणून वापर करत होती, त्याप्रमाणेच रोहितनेही सुंदरला अस्त्र म्हणून वापरले पाहीजे.





